केडीएमसी आयुक्तांवरील कारवाईचे गंडांतर टळणार
By Admin | Updated: June 3, 2016 01:55 IST2016-06-03T01:55:18+5:302016-06-03T01:55:18+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३१ मे अखेरपर्यंत ७५० घरांत शौचालये बांधण्यात आली असून साडेचारशे शौचालयांचे काम प्रगतीपथावर

केडीएमसी आयुक्तांवरील कारवाईचे गंडांतर टळणार
कल्याण : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३१ मे अखेरपर्यंत ७५० घरांत शौचालये बांधण्यात आली असून साडेचारशे शौचालयांचे काम प्रगतीपथावर असल्याचा दावा मलनि:सारण विभागाने केला आहे. त्यामुळे या प्रकरणी नगरविकास खात्याकडून आयुक्तांवर असलेली कारवाईची टांगती तलवार दूर होण्याची चिन्हे आहेत.
अनुदान घेतल्यानंतरही शौचालयाचे काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांकडून ती रक्कम माघारी घेतली जाणार आहे. ती न दिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक घरात शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. यासाठी केंद्र सरकारकडून चार, राज्य सरकारकडून ८ तसेच महापालिकेतर्फे १६ असे २८ हजारांचे अनुदान शौचालय बांधण्यासाठी दिले जात आहे. केडीएमसीच्या सर्वेक्षणात तीन हजार १६४ घरांत शौचालय नसल्याचे आढळून आले. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार केलेल्या छाननीत एक हजार ८३१ लाभार्थी निश्चित करण्यात आले. शौचालये बांधण्याचे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आयुक्त ई. रवींद्रन यांनी ठेवले होते. त्यातील ७५० शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. साडेचारशे शौचालयांचे काम सुरू असून ती अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात आहे.