केडीएमटीच्या गटांगळ्या... बंदच करा कारभार!
By Admin | Updated: July 11, 2016 02:07 IST2016-07-11T02:07:55+5:302016-07-11T02:07:55+5:30
महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला २३ मे १९९९ रोजी प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात परिवहनच्या ताफ्यात केवळ ४० बस होत्या. नंतर, टप्प्याटप्प्याने वाढ होऊन

केडीएमटीच्या गटांगळ्या... बंदच करा कारभार!
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला २३ मे १९९९ रोजी प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात परिवहनच्या ताफ्यात केवळ ४० बस होत्या. नंतर, टप्प्याटप्प्याने वाढ होऊन आजमितीला १७ वर्षांच्या कारकिर्दीत १७५ बस उपक्रमाकडे आहेत. यापैकी रोज ७० ते ८० बस धावत आहेत. परंतु, उर्वरित बस रस्त्यावर आणण्यासाठी परिवहनकडे अपुरे चालक आणि वाहक असल्याने ते शक्य नाही. आहे त्या बस धड नीट चालवता येत नसताना दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यातील ११५ बस लवकरच दाखल होणार असल्याने उपक्रमाकडे २८५ बसचा ताफा राहणार आहे. परंतु, उपक्रमाला भेडसावणाऱ्या आर्थिक चणचणीमुळे त्या ११५ बसच्या आगमनाला तूर्तास ब्रेक लागला आहे.
सध्या उपक्रमाचे गणेशघाट हे एकमेव आगार कार्यरत आहे. परिवहन उपक्रमाचे तब्बल २८ जागांवर आरक्षण आहे. परंतु, आजघडीला केवळ गणेशघाटसह वसंतव्हॅली आणि खंबाळपाडा आगारांची जागा उपक्रमाच्या ताब्यात आहे. काटेमानिवली आगाराची जागा पूर्णपणे ताब्यात घेण्याची कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, या सर्व आगारांमध्ये प्राथमिक सुविधा देण्याचे काम केडीएमसीने हाती घेतले असले तरी सद्य:स्थितीला आगार दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहेत.
उपक्रमाकडे सध्या एकूण ५६० कर्मचारी आहेत. मात्र, कार्यशाळा विभागाकडे अनुभवी आणि पुरेसे सक्षम कर्मचारी नसल्याने बसच्या दुरुस्तीचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. त्याचबरोबर, चालक आणि वाहकही कमी असल्याने बस असूनही त्या प्रवाशांच्या सेवेत आणण्यात अडचणी आहेत. यावर, आता ‘आउटसोर्सिंग’च्या माध्यमातून कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला असला तरी या प्रक्रियेला काहीसा विलंब लागण्याची शक्यता आहे. उपक्रमाने १७ वर्षांच्या कालावधीत आठ वेळा भाडेवाढ केली. ज्याज्या वेळेस भाडेवाढ केली, त्यात्या वेळेस प्रवाशांची संख्या घटत गेली. एकेकाळी ८० हजार इतकी प्रवासी संख्या होती. परंतु, आजघडीला ती ४० ते ५० हजारांवर आली आहे. निम्म्याहून प्रवासी घटले, याला शेअर रिक्षा पद्धत हेही प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर बेकायदा वाहतुकीचाही उपक्रमाला फटका बसला आहे.
जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत दाखल झालेल्या आणि भविष्यात येणाऱ्या बस जीसीसीच्या (ग्रॉस क्रॉस कॉन्ट्रॅक्ट) माध्यमातून चालवण्याचे उपक्रमाने नियोजन केले आहे. यापूर्वीही अशा प्रकारे बस चालवल्या होत्या. यात प्रति किलोमीटर ४५ ते ५० खर्च, तर उत्पन्न ४० रुपये इतके होते. याआधी, जीसीसीचा प्रस्ताव महासभेत पाठवण्यात आला होता. परंतु, तो फेटाळला होता. आता पुन्हा प्रशासनाने सुधारित प्रस्ताव दाखल केला आहे. सदस्यांचा अंकुशच नाही
महापालिकेच्याच माध्यमातून आगारातील अंतर्गत कामे सुरू केली जाणार आहेत. जर का, महापालिकेने आपला हात आखडता घेतला तर ही सेवा डबघाईला जाण्यास वेळ लागणार नाही. सुविधांनीयुक्त आगार असावेत, अशी परिवहन सदस्यांची अपेक्षा आहे. मात्र, या समिती सदस्यांचा प्रशासनावरील असलेला अंकुश पाहता या अपेक्षेची किती पूर्तता होईल, हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
घोटाळ्यांनीच गाजली सेवा
परिवहन सेवा सुविधांपेक्षा ती अनेक समस्या आणि तेथील विविध घोटाळ्यांनी जास्तच गाजली. तिकीट ट्रे, इंजीन, पीएफ, फिल्टर यासारख्या घोटाळ्यांनी परिवहन उपक्रम वादग्रस्त ठरला. २००५ च्या महापुरात भिजलेल्या तिकिटांची विक्री केल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला, तर सध्या इंजीन घोटाळा चौकशी अहवालावरील निर्णयदेखील प्रलंबित आहे.
रिक्षातळांचे अतिक्रमण
सध्या ३५ मार्गांवर सेवा सुरू आहे. परंतु, लांब पल्ल्यांचे तसेच जादा उत्पन्न देणारे मार्ग सोडले, तर जवळचे काही मार्ग उत्पन्न मिळत नसल्याने बंद करावे लागले. त्यातच, नवी मुंबई परिवहन उपक्रमाने घणसोली-महापेमार्गे मिनीबस सुरू केल्याने याचा फटका केडीएमटीच्या ‘व्होल्वो’ला बसला आहे. सुरुवातीला शहरांतर्गत सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने रस्ता रुंदीकरण झाले. परंतु, या रुंद झालेल्या बहुतांश रस्त्यांवर रिक्षातळांचे अतिक्रमण झाले. वारंवार बस बंद पडणे तसेच लागणाऱ्या आगी पाहता केडीएमटीचा प्रवासही सुरक्षित राहिलेला नाही.
सध्या ताफ्यातील २० ते २५ बस ब्रेकडाउन स्थितीत आहेत. त्यामुळे केवळ ७५ बस रस्त्यावर धावत आहेत. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांपेक्षा परिवहनचा उपक्रम विविध समस्यांनी नेहमीच गाजला. देखभाल दुरुस्तीअभावी नादुरुस्त बसचा प्रश्न गंभीर झाला आहे. बसना आगी लागण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. त्यामुळे परिवहनचा प्रवास हा एक प्रकारे जीवघेणा ठरत आहे. टाटा कंपनीच्या बसना आगी लागण्याचा घटना घडल्या आहेत. शॉर्टसर्किटने आग लागण्याचे कारण सातत्याने पुढे केले जात असले तरी गेल्या वर्षी दोन बसने पेट घेतला होता.
थांबेही दुर्लक्षित
देखभाल दुरुस्तीअभावी आगारातील व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. बसथांब्यांकडेही पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. बस वेळेत न येणे, अर्ध्या रस्त्यात बंद पडणे, यासारखी दुखणी प्रवाशांच्या पाचवीला पुजलेली असताना त्यात भर म्हणून बसथांबेही सुस्थितीत नाही.
मंजुनाथ शाळा परिसर, टिळक पथ, पेंडसेनगर, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील थांब्यांची दुरवस्था झाली आहे. बाजीप्रभू चौकात काँक्रिटीकरणाचे काम केले. यात परिवहनची चौकी बाजूला हलवली.
सद्य:स्थितीला या ठिकाणी रिक्षांनी अतिक्रमण केले आहे. काही थांब्यांचा वापर कपडे वाळत घालण्यासाठी केला जातो. तर, काही ठिकाणी थांब्यांसमोरच कचऱ्याचे ढीग जमा होत असल्याने ते गैरसोयीचे होते.
कल्याणमध्येही वाडेघर, बिर्ला कॉलेज रोड, मुरबाड रोड, सिंधीगेट, तिसगावनाका, चक्कीनाका, चिंचपाडा रोड, कैलासनगर, नेतिवली ते विठ्ठलवाडी या मार्गांवरील बहुतांश थांबे रस्ता रुंदीकरणात गायब झाले आहेत.