केडीएमसीत कोंडमारा

By Admin | Updated: February 10, 2017 04:05 IST2017-02-10T04:05:36+5:302017-02-10T04:05:36+5:30

मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांमुळे युतीमधून विस्तव जात नसतानाच त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतही (केडीएमसी) उमटत आहेत

KDMT Condom | केडीएमसीत कोंडमारा

केडीएमसीत कोंडमारा

अनिकेत घमंडी, डोंबिवली
मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांमुळे युतीमधून विस्तव जात नसतानाच त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतही (केडीएमसी) उमटत आहेत. महापालिकेच्या कारभारात आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना येथील भाजपा नगरसेवकांची आहे. त्यामुळे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, सहयोगी आमदार गणपत गायकवाड, खासदार कपिल पाटील यांनी लक्ष घालावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
केडीएमसीत भाजपाचे ४२ नगरसेवक आहेत. त्यांच्यातील काहींनी यासंदर्भात ‘लोकमत’शी दबक्या आवाजात चर्चा केली. राज्यमंत्री चव्हाण, आमदार पवार, आमदार गायकवाड तसेच खासदार पाटील यांची येथे पकड आहे. मात्र, तरीही भाजपा नगरसेवकांंमध्ये ही भावना आहे.
महापालिकेत कुठला निधी कुठे वापरायचा, त्याचे प्रस्ताव कसे करायचे, यासह विविध बाबींमध्ये प्रचंड अडचणी येत असल्याने भाजपा नगरसेवक त्रस्त आहेत. त्यांना मार्गदर्शनासाठी वरिष्ठ नेत्यांना वेळ नसल्याने त्यांची कुचंबणा झाली आहे. महापालिकेचे अधिकारी दाद लागू देत नसल्याने ही कोंडी फोडण्यासाठी आमदारांपैकी कोणी लक्ष घालावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी शिवसेना-भाजपामध्ये जो कलगीतुरा रंगला, त्याची दखल वरिष्ठांनी तातडीने घ्यावी, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. तेथे तर २७ गावांच्या ठरावाला आडकाठी घालण्यात आली; परंतु महापालिकेत प्रत्येक कामालाच विरोध होतो. त्यामुळे दीड वर्षात म्हणावे तसे एकही काम झाले नसल्याने नागरिकांना तोंड देताना नाकीनऊ येत आहेत, असे काही नगरसेवकांनी सांगितले.
शिवसेनेच्या नेत्यांना महापालिकेतील कामाचा अनुभव असल्याने ते कामे करून घेतात, पण भाजपाचे नगरसेवक नवखे असल्याने काम कसे करायचे, कोणाकडून करवून घ्यायचे, हे माहीत नसल्याने पंचाईत होत आहे. निधीही मिळत नाही. येऊन जाऊन कचरा, स्वच्छता, रस्त्यावरचे गतिरोधक यातच वेळ घालवला जात आहे. अनेकदा कमीपणा घ्यायला लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: KDMT Condom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.