‘मदर अॅण्ड चाइल्ड सेंटर’ला केडीएमसीचा थंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 01:19 IST2020-01-15T01:19:29+5:302020-01-15T01:19:35+5:30
डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केली खंत : आरोग्य सेवाव्रती पुरस्कारांचे वितरण

‘मदर अॅण्ड चाइल्ड सेंटर’ला केडीएमसीचा थंड प्रतिसाद
डोंबिवली : सूतिकागृहामध्ये ‘मदर अॅण्ड चाइल्ड सेंटर’ उभे करण्यासाठी रोटरी क्लबने केडीएमसीकडे प्रस्ताव मांडला आहे. त्यासाठी एकूण २५ कोटींची तरतूद रोटरी क्लबने केली आहे. मात्र, महापालिकेने त्याला अत्यंत थंडा प्रतिसाद दिला आहे, अशी खंत बालरोगतज्ज्ञ आणि रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय मदत निधी ट्रस्टतर्फे कै. परशुराम महाजन धनी माधवाश्रम व कै. प्रमोदिनी गजानन निमकर स्मृती आरोग्य सेवाव्रती पुरस्कारांचे वितरण शुभमंगल कार्यालयात रविवारी झाले. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. कोल्हटकर बोलत होते. हा पुरस्कार डॉ. विजय नेगलूर व डॉ. कोल्हटकर यांना मुंबई महापालिका आरोग्यसेवेचे माजी संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आ. रवींद्र चव्हाण, डॉ. निशिकांत पतंगे, डॉ. सुनील गडकरी, डॉ. यशवंत घोटीकर, डॉ. विश्वास पुराणिक, डॉ. इंद्रनील भोळे होते.
डॉ. कोल्हटकर म्हणाले की, आम्हाला पक्षीय राजकारणाशी काय घेणेदेणे नाही. अजूनही केडीएमसीने या प्रकल्पाला परवानगी दिल्यास आम्ही त्याची अंमलबजावणी करू. डोंबिवली ही सुशिक्षितांची नगरी आहे. मात्र, येथे मेडिकल कॉलेज नाही. भारतात आरोग्याची परिस्थिती गंभीर आहे. अमेरिकेत २० हजार रुपये प्रतिमाणूस आरोग्यावर खर्च केला जातो, तर भारतात हाच ९०० रुपये प्रतिमाणूस इतका अत्यल्प आहे. त्यामुळेच आपल्याला आरोग्यनिधी उभारावा लागतो. त्याची कारणे काहीही असली तरी सरकार हे करीत नाही. संस्थांना त्यासाठी पुढे यावे लागते. १९९२ मध्ये डोंबिवलीतील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन डोंबिवली फिव्हरचा नायनाट केला.
डॉ. सुपे म्हणाले की, ‘वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली असली, तरी सेवाधर्म विसरू नका. सेवाधर्म रुग्णसेवेचा कणा आहे. आपल्याकडील अर्थसंकल्प मोठे असतात. पण, त्यातील किती रक्कम प्रत्यक्ष आरोग्यसेवेवर खर्च होते, हा प्रश्न आहे. यामधून गरीब रुग्णाची सर्वाधिक परवड होते. अशा वेळी वैद्यकीय मदत निधीसारख्या संस्था खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईतील रुग्णालयात काम करताना आम्ही सामाजिक दायित्वाच्या नात्याने ५० ते १०० कोटींचा निधी उभा केला आहे. काही दिवसांपूर्वी एका ग्रामीण भागातील मुलगी उपचारासाठी मुंबईत आली होती. तिच्या पालकांकडील उपचारांसाठीचे पैसे संपले, त्यावेळी त्यांनी व्हेंटिलेटर काढण्यास सांगितले आणि निघून गेले. पण, एका डॉक्टरचे प्रथम कर्तव्य हे रुग्णाचे प्राण वाचविणे हेच आहे. प्रत्येक डॉक्टरने वैद्यकीय सेवाधर्म पाळला पाहिजे.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पुराणिक यांनी तर, सूत्रसंचालन विनय भोळे यांनी केले.