केडीएमसीच्या शाळांमध्ये पुन्हा भरणार खाजगी शाळांचे वर्ग?
By Admin | Updated: May 9, 2017 00:56 IST2017-05-09T00:56:28+5:302017-05-09T00:56:28+5:30
एकीकडे केडीएमसीच्या शाळांना पटसंख्येअभावी घरघर लागली असताना दुसरीकडे आता या शाळांमधील वर्गखोल्या खाजगी

केडीएमसीच्या शाळांमध्ये पुन्हा भरणार खाजगी शाळांचे वर्ग?
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : एकीकडे केडीएमसीच्या शाळांना पटसंख्येअभावी घरघर लागली असताना दुसरीकडे आता या शाळांमधील वर्गखोल्या खाजगी शाळांना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील दोन प्रस्ताव शनिवारच्या शिक्षण समितीच्या सभेत दाखल केले होते. परंतु, परिपूर्ण माहितीसह प्रस्ताव सादर न केल्याने प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले.
मोहने येथील यशोदीप विद्यालयाच्या वर्गखोल्या रस्ता रुंदीकरणात बाधित झाल्या आहेत. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही समस्या लक्षात घेता त्यांची सोय मोहने येथील महापालिकेच्या शाळेमध्ये केली होती. ३० एप्रिलपर्यंत शाळेच्या पाच वर्गखोल्या नाममात्र भाडेतत्त्वावर सकाळच्या सत्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, यशोदीप विद्यालयाच्या संस्थेने या वर्गखोल्या वापरण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज शिक्षण विभागाकडे केला आहे. या मुदतवाढीसह कल्याण पश्चिमेकडील बारावे परिसरातील महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत राजमाता माध्यमिक विद्यालय या खाजगी शाळेचे वर्ग एक वर्षाच्या कालावधीसाठी भरवणे, असे दोन प्रस्ताव शनिवारच्या सभेत प्रशासनाने दाखल केले होते.
बारावे येथील महापालिकेच्या शाळेतील वर्गखोल्यांची संख्या नऊ असून तेथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान वर्ग भरवले जातात. मात्र, या शाळेत राजमाता माध्यमिक विद्यालय या खाजगी शाळेच्या माध्यमिक विभागासाठी तीन वर्गखोल्या भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, तो सविस्तर माहिती घेऊन सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले.