केडीएमसी शाळा होणार ‘मॉडर्न’
By Admin | Updated: April 24, 2017 23:55 IST2017-04-24T23:55:05+5:302017-04-24T23:55:05+5:30
इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळा ओस पडत आहेत. या शाळांमधील

केडीएमसी शाळा होणार ‘मॉडर्न’
जान्हवी मोर्ये / डोंबिवली
इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळा ओस पडत आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची घटणारी संख्या रोखण्यासाठी महापालिका शाळांना मॉडर्न लूक देण्यात येणार आहे. महापालिकेच्या आठही प्रभाग क्षेत्रांमध्ये एक मॉडर्न शाळा उभारण्याचा मानस महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी काही शाळांचे व्यवस्थापन खाजगी संस्थांनाही देण्याचे विचारधीन आहे.
महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू, तामिळ आणि गुजराती माध्यमाच्या ७१ शाळा आहेत. या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने तेथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेतर्फे सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत.
महापालिकेच्या शाळांमध्ये सुविधांची वानवा आहे. अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचाअभाव, क्रीडांगणांचा अभाव अशा मूलभूत सुविधांचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागतो. गळक्या छपरांमुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात पावसाच्या धारा झेलतच शिक्षण घ्यावे लागत आहे. काही ठिकाणी वर्गखोल्या कमी असल्याने एकाच वर्गात दोन वर्ग भरवले जातात. सुरक्षारक्षक नसल्याने शाळांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य उशिराने मिळते. शिक्षण मंडळाच्या अर्थसंकल्पातून दरवर्षी कोट्यवधींची तरतूद केली जाते. मात्र, शैक्षणिक दर्जा सुधारत नसल्याने महापालिकेच्या महासभेत व शिक्षण मंडळाच्या सभेत सदस्यांकडून प्रश्नउपस्थित केले जातात. सर्वशिक्षा अभियानांतर्गतही शैक्षणिक सुविधांवर कोट्यवधींचा खर्च केला गेला. काही ठिकाणी शाळा इमारती बांधल्या आहेत. काही इमारतींची कामे अर्धवट आहेत. त्यावर, प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. या विविध कारणांमुळे महापालिका शाळेत मुलांना शिकवण्यासाठी मध्यमवर्गातील पालक उत्सुक नसतात. या सगळ्यावर मात करण्यासाठी सर्व सोयीसुविधांनीयुक्त खाजगी शाळांच्या धर्तीवर मॉडर्न शाळा प्रत्येक प्रभाग क्षेत्रात उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. या शाळा उभारण्यासाठी काही ठिकाणी विभाग निश्चित केले जातील. उदा.‘अ’ प्रभाग क्षेत्रात टिटवाळा, जेतवननगर, बल्याणी, मांडा, अटाळी, मोहने हा परिसर येतो. तेथील विद्यार्थ्यांसाठी एका शाळा तयार केली जाईल. त्यातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा, पाणी, स्वच्छता, व्हर्च्युल क्लास रूम, डिजिटल शिक्षणाची सोय, इंटरनेट, खेळाचे मैदान, उद्यान, खेळणी, सुरक्षारक्षक आदी सगळी सुविधा असेल, असे देवळेकर म्हणाले.
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा व मिलिंदनगर हे अंतर फार जास्त नाही. महापालिकेच्या तेथे दोन शाळा असतील, तर त्या एकत्रित करून त्यांचे सूसुत्रीकरण केले जाईल. मॉडर्न शाळा प्रशासनाकडून चालवल्या जाणार नाहीत. खाजगी शैक्षणिक संस्थांकडे त्यांचे व्यवस्थापन असेल, अशी माहिती देवळेकर यांनी दिली. शाळांच्या या मॉडर्न लूकला कोणाचा विरोध असण्याचे कारण तूर्तास तरी उद्भवत नाही. मात्र, त्या खाजगी संस्थांना चालवण्यास देण्यास विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.