गणेश विसर्जनासाठी केडीएमसी सज्ज
By Admin | Updated: September 15, 2016 02:19 IST2016-09-15T02:19:05+5:302016-09-15T02:19:05+5:30
कल्याण-डोंबिवलीत अनंत चतुर्दशीनिमित्त गुरुवारी सार्वजनिक १७२, तर खासगी नऊ हजार ४५० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

गणेश विसर्जनासाठी केडीएमसी सज्ज
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत अनंत चतुर्दशीनिमित्त गुरुवारी सार्वजनिक १७२, तर खासगी नऊ हजार ४५० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या वेळी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी शहरात सकाळी ११ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे.
केडीएमसीने कृत्रिम तलावांची उभारणी करण्याबरोबरच मोठ्या विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
गुरुवारी कल्याणमधील १२१, तर डोंबिवलीतील ५१ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे, तर कल्याण-डोंबिवलीतील नऊ हजार ४५० घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. केडीएमसी हद्दीतील लहानमोठ्या अशा ५२ तलावांमध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणपतीमूर्तींचे विसर्जन केले जाते. पर्यावरणरक्षणासाठी महापालिकेने डोंबिवलीत सात, तर कल्याणमध्ये तीन ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत. या तलावांत गणेशमूर्तींचे विसर्जन करून एक नवीन सुरुवात करावी तसेच मूर्तिकारांनीही गणेशभक्तांना कृत्रिम तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी गणेशोत्सवापूर्वीच केले होते. त्याला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य व इतर साहित्य उचलण्यासाठी स्वच्छता पथके तैनात केली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांच्या सूचनेनुसार कल्याण येथील दुर्गाडी गणेशघाट, दुर्गामाता चौक, दुर्गाडी गणेश मंदिर, दूधनाका, सहजानंद चौक, गफुर डोण चौक, चिराग हॉटेल, डोंबिवली येथील रेतीबंदर गणेशघाट येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विविध ठिकाणच्या विसर्जनस्थळांवर विद्युतव्यवस्था आणि ४५ जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याचबरोबर या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान आणि जीवनरक्षक तैनात राहणार आहेत.