केडीएमसीमध्ये काँग्रेसला धक्का?
By Admin | Updated: October 3, 2015 03:18 IST2015-10-03T03:18:53+5:302015-10-03T03:18:53+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांशी नगरसेवकांना गळाला लावण्यात शिवसेना-भाजपा यशस्वी झाले असतानाच आता काँग्रेसला पुन्हा धक्का देण्यासाठी डोंबिवली भाजपाने

केडीएमसीमध्ये काँग्रेसला धक्का?
डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांशी नगरसेवकांना गळाला लावण्यात शिवसेना-भाजपा यशस्वी झाले असतानाच आता काँग्रेसला पुन्हा धक्का देण्यासाठी डोंबिवली भाजपाने कंबर कसली आहे. गेली अनेक वर्षे महापालिकेतील काँग्रेसचा डोंबिवलीतील बालेकिल्ला असलेल्या इंदिरानगर परिसरात साम्राज्य असलेल्या शिवाजी शेलार यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तो होणार आहे.
काँग्रेसला हा जबर धक्का असून निदान डोंबिवलीत तरी त्या पक्षाचे अस्तित्व खालसा होण्याची चिन्हे आहेत. शहरात सध्या पक्षाचे सहा नगरसेवक असून पश्चिमेकडे तीन तर पूर्वेकडे तिघांचा समावेश आहे. रवी पाटील यांनी या आधीच शिवसेनेत प्रवेश केल्यानेही त्या पक्षाची हानी झाली होती. स्वीकृत नगरसेवक नवीन सिंग हे अद्याप तरी पक्षातच आहेत, तर अन्य एका नगरसेवकाने पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.
पक्षाचे महापालिका प्रवक्ते संतोष केणे यांच्या कुटुंबीयांपैकीही सदस्य भाजपात जाणार असल्याचीही जोरदार चर्चा होती. पण, त्यांनी या चर्चेत दम नसल्याचे ‘लोकमत’ला स्पष्ट केले. शेलार यांच्या जाण्याने काँग्रेसच्या दोन जागा कमी होतील, तर भाजपाच्या तीन जागा वाढतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात शेलार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.