युतीचा केडीएमसी पॅटर्न धोक्यात?
By Admin | Updated: May 13, 2017 00:57 IST2017-05-13T00:57:21+5:302017-05-13T00:57:21+5:30
एकमेकांसमोर लढायचे आणि नंतर सत्तेकरिता एकत्र यायचे, हा भाजपा-शिवसेनेतील ‘कल्याण-डोंबिवली पॅटर्न’ उभय पक्षांतील

युतीचा केडीएमसी पॅटर्न धोक्यात?
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकमेकांसमोर लढायचे आणि नंतर सत्तेकरिता एकत्र यायचे, हा भाजपा-शिवसेनेतील ‘कल्याण-डोंबिवली पॅटर्न’ उभय पक्षांतील तणाव वाढल्याने संकटात आला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांविरुद्ध काढलेल्या उद्गारांच्या निषेधार्थ शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे बिथरलेल्या भाजपाने गुरुवारी रात्री चौधरी यांच्या तोंडाला काळे फासले, तर संतप्त शिवसैनिकांनी डोंबिवलीमधील भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर तोडफोड केली. चौधरी यांना काळे फासल्याबद्दल डोंबिवली ग्रामीणचे भाजपा अध्यक्ष महेश पाटील यांच्यासह चार जणांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आणि त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. भाजपा कार्यालयाची तोडफोड केल्याबद्दल शिवसैनिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
गुरुवारी राज्यभर शिवसेनेने दानवेंविरोधात निषेध आंदोलन केले. यामुळे अगोदरच तणावात असलेल्या युतीमध्ये आणखी तणाव वाढला. सायंकाळी भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्राची होळी करून प्रत्युत्तर दिले. मात्र, दानवे यांच्यावर टीका करताना सेनेचा तोल गेल्याने याचा वचपा काढण्याचे डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांनी ठरवले आणि भाऊसाहेब चौधरी व उपशहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्या अंगावर महेश पाटील यांनी शाई टाकण्याची घटना गुरुवारी रात्री ९.२० च्या सुमारास गोग्रासवाडी परिसरात घडली. यामुळे संतप्त शिवसैनिक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापाशी जमा झाले. पाटील व अन्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीकरिता शिवसैनिकांनी रामनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनीही पोलीस ठाण्यास भेट देऊन कारवाईची मागणी केली. अखेर पहाटे २.३० च्या सुमारास गुन्हा दाखल झाला.