टिटवाळा शहरात केडीएमसीचा हातोडा
By Admin | Updated: December 23, 2016 03:06 IST2016-12-23T03:06:19+5:302016-12-23T03:06:19+5:30
रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या बांधकामांविरोधातील कल्याण- डोंबिवली महापालिकेची धडक कारवाई सुरूच आहे. महापालिकेच्या

टिटवाळा शहरात केडीएमसीचा हातोडा
टिटवाळा : रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या बांधकामांविरोधातील कल्याण- डोंबिवली महापालिकेची धडक कारवाई सुरूच आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी सकाळी टिटवाळा रेल्वे स्थानक ते फाटक आणि वाजपेयी चौक ते नांदप रोडपर्यंत कारवाई केली. मागील १२ वर्षांपासून या रस्त्यांचे काम रखडले होते. या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
टिटवाळ्यात दोन आठवड्यांपासून रस्ता रु ंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यात बाधित होणारी घरे, दुकाने, गाळे व इमारती यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले होते. त्यानुसार, मागील आठवड्यात सावरकरनगर ते निमकरनाका या आनंद दिघे मार्गावर कारवाई करण्यात आली.
टिटवाळ्यातील समस्या व आरक्षित भूखंडांवर झालेल्या बेकायदा बांधकामांविरोधात येथील प्रभाग क्र मांक १० गणेश मंदिर येथील नगरसेवक संतोष तरे यांनी रवींद्रन यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार, त्यांनी बुधवारी टिटवाळ्याचा पाहणी दौरा केला. त्यामुळे बेकायदा बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. या दौऱ्यानंतर रवींद्रन यांनी ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुनील पाटील यांना बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुरुवारी सकाळी १० वाजता रेल्वे फाटक ते टिटवाळा रेल्वे स्थानक व वाजपेयी चौक ते नांदप रोड येथे कारवाई करण्यात आली. त्यात ५१ घरे, बैठ्या चाळीतील खोल्या, गाळे, दुकाने, इमारती तोडण्यात आल्या. या वेळी काही प्रमाणात नागरिकांनी कारवाईत अडथळा निर्माण केला. परंतु, त्याला न जुमानता ही कारवाई सुरूच ठेवण्यात आली. या कारवाईत भवतारणी इमारतीचे गेट व शेडही पाडण्यात आली.
दरम्यान, कारवाईच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, त्यांचे तीन अधिकारी व १०० कर्मचारी तैनात होते. दोन पोकलेन, तीन जेसीबी, चार डम्पर, महापालिकेचे ६९ कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)