केडीएमसीत सत्ताधारी आले आमने-सामने

By Admin | Updated: June 21, 2016 01:16 IST2016-06-21T01:16:15+5:302016-06-21T01:16:15+5:30

महापालिकेतील सिस्टीम मॅनेजर पदाच्या नियुक्तीवरून सत्ताधारी शिवसेना-भाजपा आमने-सामने आल्याचे सोमवारच्या महासभेत पहावयास मिळाले

KDMC came to power with one-on-one | केडीएमसीत सत्ताधारी आले आमने-सामने

केडीएमसीत सत्ताधारी आले आमने-सामने

कल्याण : महापालिकेतील सिस्टीम मॅनेजर पदाच्या नियुक्तीवरून सत्ताधारी शिवसेना-भाजपा आमने-सामने आल्याचे सोमवारच्या महासभेत पहावयास मिळाले. प्रशासनाने नव्याने दाखल केलेल्या प्रस्तावावर निर्णय घ्या, असा आग्रह भाजपाचा होता. परंतु, नियुक्तीच्या वादावरून न्यायालयात धाव घेतलेल्या उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली. एकीकडे शिवसेनेच्या भूमिकेला भाजपाचा विरोध होत असताना दुसरीकडे मनसे आणि काँग्रेसची मात्र शिवसेनेला साथ लाभल्याने उमेदवार संदीप चौधरी यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविण्यात आला.
महापालिकेतील सिस्टीम मॅनेजर पद तीन वर्षे रिक्त होते. आजवर प्रभारी म्हणून या पदावर नियुक्ती केली जात होती. हे पद भरण्यासाठी काढलेल्या जाहिरातीद्वारे महापालिकेतील संगणक विभागात काम करणाऱ्या संदीप चौधरी यांनीही अर्ज भरला होता. कामाच्या अनुभवाच्या जोरावर तो निवड यादीत पहिल्या क्रमांकावर होता. परंतु, प्रशासनाने त्याची निवड न करता दुसऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले. त्यामुळेया नियुक्ती प्रक्रियेविरोधात चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चौधरी यांची बाजू योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करीत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले होते. परंतु, ठरावीक कालावधीत त्यांची निवड न झाल्याचे कारण पुढे करीत त्यांचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला.
दरम्यान, प्रशासनाने सिस्टीम मॅनेजरची नव्याने निवड करण्यासाठी पुन्हा प्रक्रिया राबविली. सोमवारच्या तहकूब महासभेच्या विषय पटलावर न्यायालयाने दिलेल्या आदेश आणि नव्या उमेदवाराची निवड करणारा प्रस्ताव प्रशासनाने मांडला. तो चर्चेला येताच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत चौधरी यांची नियुक्ती करा, अशी मागणी मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी लावून धरली. परंतु, चौधरी यांचा प्रस्ताव फेटाळला गेल्याने नव्याने निवड झालेल्या साईनाथ नांगरे यांना संधी द्यावी, आग्रह भाजपाने केला. हळबे यांच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा मिळाला आणि शिवसेना सदस्यांनी ही मागणी लावून धरली. मात्र भाजपा त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शिवसेना व भाजपा या मुद्द्यावरून आमने-सामने आल्याचे पहावयास मिळाले. (प्रतिनिधी)

Web Title: KDMC came to power with one-on-one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.