कल्याणकरांच्या झोपेचे खोबरे
By Admin | Updated: June 2, 2016 01:21 IST2016-06-02T01:21:59+5:302016-06-02T01:21:59+5:30
उकाड्याने हैराण झालेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांच्या सहनशीलतेचा मंगळवारी अंत झाला. सतत दोन दिवस मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ शेकडो संतप्त

कल्याणकरांच्या झोपेचे खोबरे
कल्याण : उकाड्याने हैराण झालेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांच्या सहनशीलतेचा मंगळवारी अंत झाला. सतत दोन दिवस मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ शेकडो संतप्त नागरिकांनी पारनाका येथील ‘महावितरण’च्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच लालचौकी परिसरात ‘रास्ता रोको’ करून आपला संताप व्यक्त केला.
मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास पश्चिमेतील बहुतांश परिसरातील वीज गायब झाली. लालचौकी, गोल्डन पार्क, आधारवाडी, सुभाषनगर, श्री कॉम्प्लेक्स, रामबाग अशा मोठ्या परिसरातील वीजपुरवठा मध्यरात्री खंडित झाला होता. बराच वेळ उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी दूरध्वनीद्वारे ‘महावितरण’च्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘कस्टमर केअर सेंटर’ला फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, या दोन्ही ठिकाणांहून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याची माहिती नागरिकांनी दिली.
दरम्यान, दोन तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. लालचौकी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा जमाव गोळा झाला. या जमावाने रस्त्यात ठिय्या मांडून दोन्हीकडचा रस्ता रोखून धरला. काही संतप्त नागरिकांचा जमाव पारनाका येथील ‘महावितरण’च्या कार्यालयावर चालून गेला. त्या वेळी या कार्यालयात एकही कर्मचारी नसताना कार्यालयातील लाइट आणि पंखे चालूच होते.
त्यामुळे आधीच संतप्त झालेल्या या जमावाचा पारा अधिकच चढल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यामुळे या जमावाने कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)