कल्याणचे शिवस्मारक कागदावरच!

By Admin | Updated: December 26, 2016 07:23 IST2016-12-26T07:23:45+5:302016-12-26T07:23:45+5:30

अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाचे नुकतेच झालेले भूमिपूजन श्रेय आणि मानापमानाच्या वादावरून चांगलेच गाजले.

Kalyan Shiva memorial on paper! | कल्याणचे शिवस्मारक कागदावरच!

कल्याणचे शिवस्मारक कागदावरच!

प्रशांत माने / कल्याण
अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाचे नुकतेच झालेले भूमिपूजन श्रेय आणि मानापमानाच्या वादावरून चांगलेच गाजले. मात्र, शिवरायांच्या नावाने राजकारण करून कल्याण-डोंबिवली महापालिकेत अनेक वर्षे सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेला कल्याणमधील प्रस्तावित शिवस्मारकाचा विसर पडला आहे.
नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरीपासून प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांनी उभारलेल्या पहिल्यावहिल्या आरमाराचे स्मारक उभारण्याची कल्पना १२ वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. परंतु, त्यासंदर्भात आजतागायत ठोस कृती न झाल्याने हे शिवस्मारक कागदावरच राहिले आहे.
पहिल्या सागरी आरमाराची उभारणी करण्यात आल्याने देशपातळीवर कल्याण शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपतींनी उभारलेल्या या सागरी आरमाराच्या स्मृती जतन करण्यासाठी केडीएमसीने २००४ मध्ये दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी खाडीकिनारी भव्य आरमार स्मारक उभारण्याची योजना आखली होती. पण, आज या घटनेला अनेक वर्षे उलटली तरी प्रत्यक्षात ठोस कृतीविना हे स्मारक आजतागायत कागदावरच राहिले आहे. विशेष म्हणजे १९९५ पासून (आघाडीची अडीच वर्षे वगळता) महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या वचननाम्यात वेळोवेळी शिवआरमार स्मारकाचा उल्लेख झालेला आहे. परंतु, तो वचननाम्यापुरताच सीमित राहिला आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही दुर्गाडी गणेशघाटाचा परिसर सुशोभित करून हे स्मारक उभारण्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर, त्यांनी जागेअभावी गौरीपाड्यातील प्रस्तावित सिटी पार्क येथे हे स्मारक उभारण्याला मान्यता दिली होती. तशी घोषणा २०११ मध्ये तत्कालीन महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनी केली होती. परंतु, ही घोषणाही हवेतच विरली. नुकत्याच २० डिसेंबरला झालेल्या महासभेत ‘सिटी पार्क’च्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या प्रस्तावात सागरी आरमार स्मारकाला बगल देण्यात आली आहे.
आरमाराचा इतिहास
च्कल्याण शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या शहराचे अस्तित्व हजारो वर्षांपासून आहे. जगाशी व्यापारी संबंध असणारे मोक्याचे ठिकाण म्हणूनही कल्याणचे बंदर प्रसिद्ध होते. याच बंदरात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या सागरी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.
च्स्वराज्याच्या स्थापनेच्या कालावधीत छत्रपतींचे वास्तव्य काही काळ कल्याणमध्ये होते. २४ आॅक्टोबर १६५७ ला छत्रपतींनी कल्याणबरोबरच भिवंडी हे दोन्ही सुभे जिंकले होते. या विजयात महाराजांच्या मावळ्यांनी बजावलेला पराक्रम अतुलनीय होता.
च्छत्रपतींनी हिंदवी स्वराज्यात कोकणातला आपला पाया भक्कम केला. मैदानी लढाईत मराठे कधीच कमी पडणार नाहीत, हे महाराज जाणून होते. शत्रू कितीही प्रबळ असला तरी पराभवाची भीती नव्हतीच. प्रश्न होता तो समुद्री आक्रमणाचा. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर लाभलेल्या किनारपट्टीमुळे, असा हल्ल्याचा धोका शिवाजी महाराजांनी ओळखला होता.
च्गडकिल्ल्यांना भक्कम तटबंदीबरोबरच सक्षम सागरी आरमारही आवश्यक आहे, या जाणिवेतून त्यांनी सागरी आरमार उभारण्याकडे लक्ष दिले आणि त्याची मुहूर्तमेढ कल्याणमध्ये रोवली गेली. या कामावर देखरेख राहावी, यासाठी स्वत: महाराजांचे वास्तव्य तीन महिने कल्याणमध्ये होते.
च्दरम्यान, या सागरी आरमाराद्वारे महाराजांनी अनेक धाडसी मोहिमा सहज फत्ते केल्या होत्या.

Web Title: Kalyan Shiva memorial on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.