कल्याण-शीळ मार्ग लखलखणार
By Admin | Updated: February 23, 2017 05:38 IST2017-02-23T05:38:34+5:302017-02-23T05:38:34+5:30
कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या कल्याण-शीळ मार्गावर लवकरच नवीन पथदिवे बसवण्यात येणार आहेत.

कल्याण-शीळ मार्ग लखलखणार
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या कल्याण-शीळ मार्गावर लवकरच नवीन पथदिवे बसवण्यात येणार आहेत. केडीएमसी हद्दीतील नेतिवलीतील टाटा पॉवर ते निळजे गावातील काटईनाका परिसरातील रोडवर हे पथदिवे बसवण्यात येतील. त्यासाठी २ कोटी १८ लाख १९ हजार ८४ रुपये खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.
कल्याण-शीळ मार्गावरील १५ वर्षे जुने झालेले, नादुरुस्त पथदिवे बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हा परिसर एमआयडीसीतील केमिकल झोनलगत असल्याने येथील पथदिव्यांचे खांब गंजण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सध्याचे जुने पथदिवे काढून तेथील दुभाजकावर नवीन दिवे बसवण्यात येणार आहेत.
नादुरुस्त पथदिव्यांबाबत महापालिकेच्या २० आॅक्टोबर २०१६ च्या महासभेत सदस्यांकडून उपस्थित झालेल्या मुद्यांवर आयुष्यमान संपलेले पथदिवे काढून त्याजागी नवीन पथदिव्यांची व्यवस्था करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, प्रशासनाने निविदा प्रक्रिया पार पाडून संबंधित प्रस्ताव खर्चाच्या मान्यतेसाठी बुधवारच्या स्थायीच्या सभेत दाखल केला होता.
दरम्यान, केडीएमसीतून २७ गावे वगळण्याची टांगती तलवार कायम असल्याने कंत्राटदार कामे घेण्यास धजावत नव्हता. परंतु, कंत्राटदारांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा पवित्रा महापालिकेने घेतल्याने आता ग्रामीण भागातील विकासासाठी कंत्राटदार पुढे येत असल्याचे सभापती रमेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)