कोविडकाळातील दोन हजार प्रलंबित प्रकरणे कल्याण आरटीओने काढली निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST2021-09-23T04:45:54+5:302021-09-23T04:45:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मुदत संपलेले लर्निंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यासह इतर कामांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात ...

कोविडकाळातील दोन हजार प्रलंबित प्रकरणे कल्याण आरटीओने काढली निकाली
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मुदत संपलेले लर्निंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यासह इतर कामांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोविड काळात ज्यांची कामे राहिली त्यांना ती मुभा देण्यात आली आहे. कल्याण आरटीओ हद्दीत मात्र सर्व दोन हजार प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात आली आहेत. पुरेसे कर्मचारी मिळाल्याने वेगाने कार्यवाही होत असल्याचा दावा आरटीओ अधिकारी तानाजी चव्हाण यांनी केला.
गतवर्षी प्रलंबित असलेली लायसन्सची कामे ३० सप्टेंबरपर्यंत करण्याचे आदेश शासनाने दिले होते, त्यामुळे अन्यत्र कोटा फुल्ल असल्याने लायसन्स बाद होण्याची भीती नागरिकांमध्ये असली तरी कल्याण आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रकरणे प्रलंबित नसल्याचे म्हटले आहे.
---------------------
काय आहेत अडचणी?
ही कामे करण्यासाठी कल्याण आरटीओ हद्दीत नागरिकांना नेमके तिथे जाऊन फॉर्म भरायचा आहे, की ऑनलाइन अर्ज करायचा, हे समजत नाही. त्यातच जरी ऑनलाइन केले असले तरी काम होईल का, याबाबतची शाश्वती नसल्याने आरटीओ कार्यालयात जाण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. नियमानुसार अपॉइंटमेंट घेतल्यास अडथळे येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
--------------------------
तारीख मिळालेले काही नागरिक त्या दिवशी काही कारणाने येत नाहीत असेही दिसून आले आहे. त्या नागरिकांत पुन्हा तारीख घेताना संभ्रम दिसून येत आहे. तारीख पुन्हा कशी घ्यायची, त्यासाठी काय प्रोसेस आहे याबाबत माहिती मिळविणे कठीण जात असल्याचे सांगण्यात आले.
---------------
कल्याण आरटीओ क्षेत्रात रोजचा कोटा हा ६४० पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे तेवढ्या नागरिकांना ड्रायव्हिंग टेस्ट करवून घेण्यासह अन्य सर्व कामे करण्यासाठी थेट कार्यालयात जाऊन सेवा मिळत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
-----------------
नागरिकांची अपॉइंटमेंट लॅप्स झाल्यास पुन्हा देण्यात येत असून, त्यासाठी सकाळी ८.३० पासून कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
------------
लायसन्स नव्याने काढावे लागणार की काय?
ज्या नागरिकांना अपॉइंटमेंट घेऊन जाता आले नसेल त्यांना पुन्हा ती मिळू शकते, परंतु त्यासाठी सबळ कारण, संबंधित कागदपत्रे देण्याची गरज असते. ती असतील तर मात्र लायसन्स रद्द होत नाही. साधारण तीन महिने मुदतवाढ मिळू शकते; पण सगळ्यांनाच नाही तर तसे ठोस कारण असणे आवश्यक आहे.
---------------
आरटीओचा फुल्ल स्टाफ हा प्रलंबित, सध्याचे लायसन्स विषय क्लिअर करण्याकामी लावण्यात आला आहे. दोन हजार प्रलंबित प्रकरणे यासंदर्भात निकाली काढली. आता रोजची कामे सुरू असून, त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येतात. पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू आहे. कागदपत्रांची पूर्तता करून अटी-शर्थींचे पालन करणाऱ्याला अडथळे येत नाहीत. ज्यांना अडचण येईल त्यांनी थेट मला संपर्क करावा. - तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण