कल्याण-डोंबिवलीकर वाहतूककोंडीने त्रस्त
By Admin | Updated: March 4, 2016 01:36 IST2016-03-04T01:36:23+5:302016-03-04T01:36:23+5:30
कल्याण-डोंबिवली शहरांतील मुख्य वर्दळीचे रस्ते, चौक सकाळ ते रात्री उशिरापर्यंत वाहतुकीने गजबजलेले असतात.

कल्याण-डोंबिवलीकर वाहतूककोंडीने त्रस्त
आकाश गायकवाड, डोंबिवली
कल्याण-डोंबिवली शहरांतील मुख्य वर्दळीचे रस्ते, चौक सकाळ ते रात्री उशिरापर्यंत वाहतुकीने गजबजलेले असतात. या सततच्या वाहतूककोंडीमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, व्यावसायिक, वाहनचालक हैराण झाले आहेत. शहरातील रस्ते, चौक तेच पण वाहने दामदुप्पट आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांसह वेड्यावाकड्या उभ्या असलेल्या रिक्षांच्या विळख्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्याचे प्रभावी उपाय लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन व वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये नसल्याने नागरिकांना वाहतूककोंडी सहन करावी लागत आहे.
कल्याणमधील शिवाजी चौक, सहजानंद चौक, लाल चौकी, महात्मा फुले चौक, वलीपीर रस्ता, दीपक हॉटेल, महालक्ष्मी ते गुरु देव हॉटेल हे मुख्य रस्ते सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत वाहतूककोंडीने गजबजलेले असतात. गेली काही वर्षे कल्याण-डोंबिवली शहरांत दिवसा अवजड वाहनांना मज्जाव होता. ही वाहने रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत शीळफाटा ते दुर्गाडी किल्ला रस्त्याने ये-जा करीत असत. या वेळेवर वाहतूक पोलिसांचे यापूर्वी कडक नियंत्रण होते. आता कंटेनर, ट्रेलर व सर्व प्रकारची अवजड वाहने दिवसाढवळ्या या पोलिसांसमोरून कल्याण शीळफाटा, पत्रीपूल, शिवाजी चौकमार्गे दुर्गाडी पुलावरून भिवंडीच्या दिशेने जातात.
ती शहरातून नेताना एका कोपऱ्यावर वाहतूक पोलीस आणि अवजड ट्रकचा चालक ‘हस्तांदोलन’ करतानाचे चित्र नागरिक पाहत असतात. तर, डोंबिवलीतही सकाळच्या वेळेस रेती वाहून नेणाऱ्या ट्रकचालकांशी ‘हस्तांदोलन’ करताना शहर पोलीस आणि वाहतूक पोलीस सर्रास दिसतात. कल्याण शहरात भाजीबाजार, घाऊक बाजार असल्याने भिवंडी, शहापूर, मुरबाड, वाडा तालुक्यांतील व्यापारी वाहने घेऊन खरेदीसाठी कल्याणमध्ये येतात. नेहमीच्या वाहतूककोंडीत या वाहनांनी भर पडते. चाकरमानी, एमआयडीसी, उद्योग-व्यावसायिक मंडळी दररोज आपल्या वाहनाने ठाणे, मुंबई, पनवेल, नाशिक दिशेने जातात. शालेय विद्यार्थ्यांच्या बस अशा वाहनकोंडीचा अनोखा संगम दररोज कल्याण-डोंबिवलीत पाहण्यास मिळत आहे.
डोंबिवली पूर्व भागातील फडके चौक, बाजीप्रभू चौक, दत्तनगर चौक, कोपर उड्डाणपूल, गावदेवी मंदिर, मानपाडा, सागाव रस्ता, डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानक भागातील पंडित दीनदयाळ चौक, गोपी चौक, महात्मा गांधी चौक, सुभाष चौक, रस्ते, सम्राट चौक सकाळपासून वाहतूककोंडीने गजबजलेले असतात. तुटपुंजे वाहतूक पोलीस या कोंडीवर नियंत्रण आणण्यात कमी पडत आहेत. शालेय बस, अवजड सामानाचे ट्रक, त्यात पालिकेची कचरा उचलणारी वाहने यात भर घालतात. रेल्वेने स्थानक भागात वाहनतळ सुरू करूनही नागरिक तेथे पैसे द्यावे लागतात म्हणून रस्त्यांच्या दुतर्फावाहने उभी करतात.