कल्याण-डोंबिवली फणफणली!

By Admin | Updated: July 5, 2016 02:30 IST2016-07-05T02:30:56+5:302016-07-05T02:30:56+5:30

वातावरणाच्या बदलामुळे कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. महिनाभरात तापाचे तीन हजार ५४८ रुग्ण आढळले आहेत. रक्ततपासणीनंतर यातील ३२ जणांना

Kalyan-Dombivli funkhanali! | कल्याण-डोंबिवली फणफणली!

कल्याण-डोंबिवली फणफणली!

कल्याण : वातावरणाच्या बदलामुळे कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. महिनाभरात तापाचे तीन हजार ५४८ रुग्ण आढळले आहेत. रक्ततपासणीनंतर यातील ३२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, ७३ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. या साथीच्या धर्तीवर केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकांमार्फत ठिकठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे. दोन्ही शहरांमध्ये कोणतीही साथ नसल्याचा दावा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी केला आहे.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने सध्या जोर धरला आहे. हा वातावरणातील बदल नागरिकांसाठी ‘ताप’दायक ठरला आहे. यात सध्या मोठ्या प्रमाणावर तापाचे रुग्ण शहरात आढळत आहेत. ते पाहता एखाद्या साथीच्या रोगाने डोकेवर काढले की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.
डोंबिवलीतील सागर्ली परिसरातील निशांत ब्राह्मणे या चार वर्षांच्या मुलाचा शुक्रवारी डेंग्यूने मृत्यू झाला. तो राहत असलेल्या विठ्ठल प्लाझा इमारतीतील १० ते १२ रहिवाशांनादेखील डेंग्यूच्या आजाराने ग्रासले आहे. केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने मात्र अहवाल आल्यानंतरच निशांतचा मृत्यू डेंग्यूने झाला की नाही, हे स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. दरम्यान, एकंदरीतच जूनपासूनचा आढावा घेऊनवैद्यकीय आरोग्य विभागाने कल्याण-डोंबिवलीतील एक लाख ९ हजार ७०२ घरांचे सर्वेक्षण केले. यातील चार लाख ७३ हजार ९९३ नागरिकांची तपासणी केली. यात तापाचे ३ हजार ५४८ रुग्ण आढळले. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले असता ३२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले. परंतु, यातील १७ रुग्ण महापालिका हद्दीतील, तर उर्वरित १५ बाहेरचे होते, अशी माहिती डॉ. रोडे यांनी दिली.
डेंग्यूसदृश आजाराचे ७३ रुग्ण आढळले. परंतु, ते सर्व संशयित आहेत, तर लेप्टोचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. महापालिका रुग्णालये, अन्य खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या या रुग्णांची उपचाराअंती प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.
१ जूनपासून महापालिका हद्दीतील सर्वेक्षण सुरू आहे. १३ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत १३ पथके त्यासाठी तैनात आहेत. घराघरांतील पाण्यातील क्लोरिनचे प्रमाणही तपासले जात आहे. आतापर्यंत ६४७ ठिकाणचे पाणीनमुने तपासले. यात २० ठिकाणी क्लोरिनचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. तेथे स्थानिक प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दोन हजार ७५७ क्लोरिनच्या बाटल्यांच्या पुरवठा करण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयांना त्यांच्याकडे दाखल असलेल्या तापाच्या रुग्णांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेतर्फे दरबुधवारी खाजगी रुग्णालयांना भेटी दिल्या जात असल्याचे रोडे यांनी सांगितले.

ताप असल्यास त्वरित रक्ततपासणी करा

घराच्या परिसरात पाणी साठणार नाही, याची काळजी घ्या. ते साठत असल्यास ते वाहते करा. परिसरातील गटारे व पावसाचे पाणी वाहून जाईल, याची काळजी घ्या.

कोणताही ताप असल्यास त्वरित रक्ततपासणी करा, असे जाहीर
आवाहन केडीएमसीने केले आहे.

डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरातील फुलदाणी, मनी प्लांट, वॉटरकूलर आदी ठिकाणचे पाणी आठवड्यातून एकवेळ पूर्णपणे बदला. घरातील साठा केले जाणारे पाणी आठवड्यातून पूर्णपणे बदला. जमिनीवरील व गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांची झाकणे व्यवस्थित लागतील, याची काळजी घ्या.

पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे. भाज्या, फळे इत्यादी वस्तू स्वच्छ धुऊन मगच खाण्यासाठी वापराव्यात.

शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर कारवाई कधी?
एकीकडे शहरातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असताना दुसरीकडे उघड्यावरचे अन्न खाऊ नये, असे आवाहन महापालिका करत आहे. परंतु, उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्यांना मात्र सर्रासपणे कारवाईअभावी अभय दिले जात असल्याचे चित्र आहे. कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर, महत्त्वाचे चौकांत, डोंबिवली एमआयडीसी कार्यालयासमोरील पेंढरकर महाविद्यालयाच्या बाहेरही हातगाड्या सर्रासपणे सुरू आहेत. पावसाळ्यात या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर कारवाई केली जाते. परंतु, पावसाने जोर धरला तरी
अद्याप कारवाईला मुहूर्त मिळालेला नाही.

जिल्ह्यात अतिसार, गॅस्ट्रोचे ४३६ रुग्ण
जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या दलदलीमुळे साथीच्या आजारांत वाढ होताना आढळून येत आहे. थंडी, ताप, कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार, डेंग्यू आणि हिवतापाने ४३६ हून अधिक रुग्ण ग्रामीण भागात हैराण आहेत. परंतु, जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या दप्तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील केवळ डेंग्यूचा एक रुग्ण असून संशयित म्हणून एका रुग्णाची नोंद आहे.

Web Title: Kalyan-Dombivli funkhanali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.