अवघ्या १२ तासांमध्ये पोलिसांनी लावला चोरीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:52+5:302021-02-24T04:41:52+5:30
ठाणे : वाघबीळ भागातील एका दुकानाचे शटर उचकटून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करून पसार झालेल्या अमोल इंगळे (२९, रा. मानपाडा, ...

अवघ्या १२ तासांमध्ये पोलिसांनी लावला चोरीचा छडा
ठाणे : वाघबीळ भागातील एका दुकानाचे शटर उचकटून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करून पसार झालेल्या अमोल इंगळे (२९, रा. मानपाडा, ठाणे) याला अवघ्या १२ तासांमध्येच अटक करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले. त्याच्याकडून ५५ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी मंगळवारी दिली.
वाघबीळ येथे न्यू कैलास इलेक्ट्रिक ॲण्ड सॅनेटरी हे दुकान आहे. मंजी चौधरी या दुकानमालकाने २२ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांचे दुकान बंद केले. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांनी दुकान उघडले असता त्यांना दुकानातील पंखे, गिझर आणि एलईडी ट्युबलाइट असा सुमारे ५५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळले. त्यानुसार चौधरी यांनी या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, यातील संशयित आरोपी अमोल हा चितळसर मानपाडा येथील भवानीनगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती खैरनार यांना मिळाली. त्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे यांच्या पथकाने सापळा रचून अमोल याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने या चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून १० हजारांच्या ५० एलईडी ट्युबलाईट, १५ हजारांचे १० पंखे आणि ३० हजारांचे १२ गिझर असा ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमोल हा अशा चोऱ्या करण्यात माहिर असून त्याने यापूर्वी कोणत्या ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत का? याचाही तपास सुरू असल्याचे खैरनार यांनी सांगितले.