बेकायदा बॅनरबाजी व समाज माध्यमांच्या गोंधळा बद्दल न्यायमूर्तींची नाराजी

By धीरज परब | Updated: March 9, 2025 14:13 IST2025-03-09T14:13:17+5:302025-03-09T14:13:54+5:30

कार्यक्रमाच्या ठिकाणी मोबाईल व कॅमेरे धारक समाज माध्यम, छायाचित्रकारांनी गोंधळ घातल्या बद्दल देखील न्यायमूर्तीनी संताप व्यक्त केला. घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे.

Judges express displeasure over illegal banner display and social media chaos | बेकायदा बॅनरबाजी व समाज माध्यमांच्या गोंधळा बद्दल न्यायमूर्तींची नाराजी

बेकायदा बॅनरबाजी व समाज माध्यमांच्या गोंधळा बद्दल न्यायमूर्तींची नाराजी

मीरारोड - मीरा भाईंदरच्या न्यायालयाच्या उदघाटनासाठी आलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक हे बेकायदा बॅनरबाजी पाहून तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी समाज माध्यमांचा  गोंधळ पाहून  संतापले . 

मीरारोड येथील न्यायालयाच्या उदघाटनासाठी आलेले अभय ओक हे आधी भाईंदरच्या उत्तन येथील ज्युडिशियल अकादमी येथे गेले होते. उदघाटन कार्यक्रमात बोलताना ओक म्हणाले की , शहरात त्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला न्यायालयाच्या उदघाटनाचे बॅनर लावलेले दिसले त्याचा त्यांना आनंद वाटला.  मात्र तो आनंद काही काळच टिकला. कारण  बॅनरवर पालिकेची परवानगी नमूद नसल्याचे निदर्शनास आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या बॅनर वर कारवाई बाबतच्या आदेशाची उपस्थितांना आठवण करून देत पालिकेचे कर्तव्य आहे कि बेकायदा बॅनर तात्काळ काढले गेले पाहिजेत. न्यायालयाच्या उदघाटनाचे बेकायदा फलक लावले गेले असे होता कामा नये अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. 

कार्यक्रमाच्या ठिकाणी मोबाईल व कॅमेरे धारक समाज माध्यम, छायाचित्रकारांनी गोंधळ घातल्या बद्दल देखील न्यायमूर्तीनी संताप व्यक्त केला. घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मीडियाचे स्वातंत्र्य फार महत्वाचे आहे व ते  टिकवून ठेवण्याची जबाबदारी न्याय व्यवस्थेची आहे. अनेक कटू गोष्टी न्यायाधीशांना सांगितल्या पाहिजेत . 

पत्रकार व समाजमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगायचे आहे कि, हा कार्यक्रम राजकीय व नटनट्यांचा कार्यक्रम नाही त्यामुळे शिस्त पाळली गेली पाहिजे. नामफलक अनावरण वेळी सुद्धा बेशिस्त वर्तन झाले. जागतिक महिला दिनी अनेक महिलांना धक्काबुक्की केली हे मी स्वतः पहिले आहे असे न्यायमूर्ती ओक म्हणाले . अश्या पद्धतीने वागणार असतील तर न्यायालयाच्या कार्यक्रमाला बोलवायचे कि नाही याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे असे ते म्हणाले . यावेळी महिलांना झाल्या धक्काबुक्की बद्दल न्यायमूर्तीनी दिलगिरी व्यक्त केली .  

Web Title: Judges express displeasure over illegal banner display and social media chaos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.