हास्यप्रेमींनी लुटला खळाळता आनंद
By Admin | Updated: May 8, 2017 06:10 IST2017-05-08T06:10:37+5:302017-05-08T06:10:37+5:30
गाणे, नाचणे, लहान मुलांसारखे टाळ्या वाजवणे असे करतकरत खळाळून हसत, सात मजली हास्याची धबधबा सोडत ठाण्यात

हास्यप्रेमींनी लुटला खळाळता आनंद
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गाणे, नाचणे, लहान मुलांसारखे टाळ्या वाजवणे असे करतकरत खळाळून हसत, सात मजली हास्याची धबधबा सोडत ठाण्यात रविवारी जागतिक हास्यदिन साजरा झाला. यावेळी हास्यप्रेमींनी विविध हास्यप्रकार सादर केले आणि तणावमुक्तीसाठी खळखळून हसण्याचा आनंद लुटला.
कचराळी तलाव येथे जागतिक हास्यदिनानिमित्त २० हास्यक्लब एकत्र आले होते. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. ४० वर्षे ते ८० वर्षे वयोगटातील जवळपास ३०० हून अधिक हास्यप्रेमी यावेळी उपस्थित होते. दरवर्षी सोहळ््याच्या आयोजनाची जबाबदारी एका क्लबवर असते. यंदा ही जबाबदारी प्रज्ञा हास्यक्लब, हिरानंदानी मेडोज यांनी पार पाडली. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. माधवी कयाळ यांनी स्वागत करताच मुख्य सोहळ््याला सुरूवात झाली.
हास्यक्लबचे सर्वेसर्वा डॉ. मदन कटारिया यांचा संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला. १०६ देशांत झालेला हास्ययोगाचा प्रचार, त्यातून हास्यकुटुंबांची निर्मिती यांचा उल्लेख या संदेशात होता. जेव्हा तुम्ही हसाल तेव्हा तुम्ही बदलाल आणि जेव्हा तुम्ही बदलाल तेव्हा तुमच्या भोवतालचे जग बदलेल, हे त्यांचे घोषवाक्य वाचून दाखविण्यात आले. हसण्याचे शरीराला होणारे फायदे सांगत एबीसी लाफ्टर योगा क्लबचे संस्थापक डॉ. माधव म्हस्के यांनी संपूर्ण शहर हसरे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.