खड्ड्यांतून कुंभ यात्रेकरूंचा प्रवास
By Admin | Updated: August 10, 2015 23:10 IST2015-08-10T23:10:18+5:302015-08-10T23:10:18+5:30
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, महामार्गांवरील खड्डे पाहता या हजारो कोटी रुपयांचा खर्च

खड्ड्यांतून कुंभ यात्रेकरूंचा प्रवास
कसारा : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, महामार्गांवरील खड्डे पाहता या हजारो कोटी रुपयांचा खर्च कोणी, कुठे व कसा केला, याबाबत सध्या संशय व्यक्त होत आहे.
कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर, सर्वतीर्थ टाकेद, कावनई या तीर्थांसह नाशिकलगतच्या महत्त्वाच्या रेल्वे महामार्गावर भाविकांची गैरसोय अथवा काही प्रसंग उद्भवू नये, यासाठी कसारा रेल्वे स्थानक, मुंबई-नाशिक महामार्ग, घोटी-सिन्नर (सर्वतीर्थ टाकेदफाटा), घोटी-कावनई, नाशिक-त्र्यंबकेश्वर या भागांतील रस्ते सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी शासनाची आहे.
या संबंधित शासनाने त्यात्या कार्यक्षेत्रातील सा.बां. विभाग, नॅशनल हाय वे अॅथॉरिटी, रेल्वे प्रशासन यांना भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नियोजन करण्याचे आदेश दिले होते. परिणामी, सद्य:स्थितीत कुंभमेळा सुरू होऊन महिना उलटला तरीदेखील कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही.
मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर वडपा (भिवंडी) ते नाशिकपर्यंत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांबाबत गॅमन इंडिया या ठेकेदार कंपनीला अनेकदा तक्रारी केल्या, परंतु कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. नाशिक-घोटी येथून सर्वतीर्थ टाकेदकडे अथवा शिर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोटी, कावनई रस्त्यांवरदेखील खड्ड्यांचे साम्राज्य जैसे थे आहे.
तीर्थक्षेत्री जाणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने हजारो भाविक, त्यातच बाहेरच्या राज्यांतून येणारे भाविक प्रशासनास शिव्यांची लाखोली वाहत
आहेत. कसारा स्थानकाबाहेर रस्त्यावर रात्रीच्या वेळी असलेला अंधार, बस स्टॅण्ड, टॅक्सी स्टॅण्ड नसल्याने प्रवाशांची होणारी फरफट आजही कायम आहे.
...फक्त पोलीस प्रशासन सज्ज
कुंभमेळ्यात कायदा-सुव्यवस्था, भाविक सुरक्षा याकरिता पोलीस प्रशासन मात्र अॅलर्ट आहे. नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या कसारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, प्रवासी भाविक सुरक्षित राहावे, यासाठी ठाणे (ग्रा.) पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, नाशिक (ग्रा.) पोलीस अधीक्षक संजय मोहिते, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव पिंगट, प्रभारी अधिकारी अजय वसावे, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी संजय गायकवाड यांच्यासह रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी कसारा रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था कार्यरत केली. चेक पोस्ट, संशयित प्रवासी यांची झाडाझडती सुरू केली. त्यामुळे रेल्वे प्रवासी, वाहनचालक, प्रवासी सुरक्षित आहेत.
रेल्वे पोलीस (जीआरपी) प्रशासनाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कनकरत्नम, मधुकर पांडे, रेश्मा अंबुरे यांनीदेखील कसारा रेल्वे स्थानकाची पाहणी करून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आखली. मात्र, भाविकांच्या सोयीसुविधांसाठी पोलीस यंत्रणावगळता सर्वच शासकीय यंत्रणा डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प बसली आहे. जर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, हा सवाल जैसे थे आहे.
(वार्ताहर)