जेसल पार्क चौपाटीवर खत प्रकल्प
By Admin | Updated: March 25, 2017 01:16 IST2017-03-25T01:16:53+5:302017-03-25T01:16:53+5:30
पूर्वेकडील जेसल पार्क चौपाटीवर टाकण्यात येणाऱ्या सुमारे ५० किलो निर्माल्यापासून गांडूळ खताच्या निर्मितीचा प्रकल्प पालिकेने

जेसल पार्क चौपाटीवर खत प्रकल्प
भार्इंदर : पूर्वेकडील जेसल पार्क चौपाटीवर टाकण्यात येणाऱ्या सुमारे ५० किलो निर्माल्यापासून गांडूळ खताच्या निर्मितीचा प्रकल्प पालिकेने नुकताच सुरू केला. पालिकेच्या या पहिल्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा होत असतानाच असे प्रकल्प ठिकठिकाणी सुरू करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी केले.
मीरा-भार्इंदर शहरांना खाडी व पश्चिम समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. यामुळे येथील काही ठिकाणी किनाऱ्यावर चौपाट्यांची निर्मिती झाल्याने अनेक पर्यटक तेथे फिरण्यासाठी येत असतात. काहीजण निर्माल्य तेथील पाण्यात टाकतात. यामुळे पाण्यातील जलप्रदूषणात वाढ होऊन त्यातील जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येते.
भार्इंदर पश्चिम व पूर्वेकडील जेसल पार्क चौपाटीवर पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे येथे टाकण्यात येणाऱ्या निर्माल्यासह टाकाऊ वस्तू तसेच कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. पाण्यात टाकण्यात येणारे निर्माल्य जमा करण्यासाठी पालिकेने या चौपाट्यांवर छोटीशी जागा दिली आहे.
हा कचरा उचलून चौपाटी स्वच्छ ठेवण्याची मोहीम पालिकेने अगोदरच सुरू केली असली, तरी साठणाऱ्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा मानस पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अभय सोनावणे यांनी व्यक्त केला. त्याला आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर जेसल पार्क चौपाटीला प्राधान्य देण्यात आले. येथे दररोज जमा होणाऱ्या सुमारे ५० किलो निर्माल्यापासून गांडूळ खताच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आली. एका लहानशा जागेत सुरू केलेल्या प्रकल्पातील खत पालिकेच्या विविध उद्यानांतील झाडांसाठी वापरण्यात येते.
त्याचप्रमाणे प्रकल्पाच्या बाजूकडील मोकळ्या जागेत विविध प्रकारच्या पालेभाज्यांची लागवडही केली जाते. अशा प्रकारे वर्षाकाठी सुमारे दीड टन खताची निर्मिती होणार आहे. जमा होणाऱ्या निर्माल्यासह कचऱ्यातील अविघटन कचरा वेगळा करून उर्वरित विघटन कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येते.
पालिकेच्या या स्तुत्य प्रकल्पाची प्रशंसा होत असली, तरी असे प्रकल्प इतर स्वच्छता निरीक्षकांनीसुद्धा ठिकठिकाणी सुरू करावे. तसेच नागरिकांनीही आपापल्या इमारतींतील छोट्याशा मोकळ्या जागेत असे प्रकल्प सुरू करून शून्य कचरा मोहिमेला सुरुवात करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. (प्रतिनिधी)