जयनाथ पूर्णेकर यांची भावासाठी माघार
By Admin | Updated: February 8, 2017 04:06 IST2017-02-08T04:06:25+5:302017-02-08T04:06:25+5:30
ठाण्यात महापौरपदाचे स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाला एका मागून एक धक्के बसू लागले आहेत. आधी संजय घाडीगावकर आणि लॉरेन्स डिसोझा यांचे

जयनाथ पूर्णेकर यांची भावासाठी माघार
ठाणे : ठाण्यात महापौरपदाचे स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाला एका मागून एक धक्के बसू लागले आहेत. आधी संजय घाडीगावकर आणि लॉरेन्स डिसोझा यांचे अर्ज बाद झाले असतांना आता पक्षाला आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविणारे विद्यमान नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांना चक्क आपल्या बंधूसाठी निवडणुकीच्या रिंगणातूनच माघार घेतली आहे. भाजपाला हा आता आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपा २५ जागेपर्यंत पोहचेल, असे चित्र आहे. परंतु, आता भाजपाला हा आकडा गाठतांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यांचे एकेक प्यादे निवडणुकीच्या शतरंजच्या खेळातून बाद होऊ लागल्याने ही संख्या गाठणेदेखील अवघड बसल्याचे चित्र आहे. छाननीच्या दिवशीच भाजपाचे कणखर नेतृत्व समजले जाणारे आणि वागळेपट्यात पालकमंत्र्यांना थेट आव्हान देऊ शकणारे अशी ज्यांची ओळख होती. ते संजय घाडीगावकर यांचा अर्ज बाद झाला, त्यानंतर सोमवारी लॉरेन्स डिसोझा जे भोईर अॅण्ड कंपनीला लढत देऊ शकणार होते त्यांचाही अर्ज बाद झाला. या दोन धक्यातून सावरत नाही तोच भाजपाला आणखी एक धक्का बसला.
जयनाथ पूर्णेकर यांनी चक्क निवडणुकीच्या रिंगणातूनच माघार घेतली आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधीच पूर्णेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासमोर त्यांचे सख्ये चुलत बंधू छत्रपती पूर्णेकर हे काँंग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. भाऊबंदकी जपण्याच्या नादात भाजपाला मात्र हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. (प्रतिनिधी)