जवानांचे वारस लवकरच केडीएमसीच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:26 IST2018-12-14T23:26:08+5:302018-12-14T23:26:30+5:30
विहीर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले अग्निशमन दलातील जवान अनंत शेलार आणि प्रमोद वाघचौडे यांच्या वारसांना लवकरच केडीएमसीच्या सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.

जवानांचे वारस लवकरच केडीएमसीच्या सेवेत
कल्याण : विहीर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले अग्निशमन दलातील जवान अनंत शेलार आणि प्रमोद वाघचौडे यांच्या वारसांना लवकरच केडीएमसीच्या सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासनाची यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वारसांचा वैद्यकीय तपासणी अहवाल मिळताच त्यांना सेवेत रुजू करून घेतले जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांनी दिली.
कल्याण पूर्वेला १ नोव्हेंबरला विहिरीत उतरलेल्या शेलार आणि वाघचौडे यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या जवानांना सुरक्षेची साधने देण्यात आलेली नव्हती, असा आरोप होत आहे. विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू ओढावल्याचा दावा संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. मात्र घटनास्थळी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भारतीय कामगार सेना या कामगार संघटनेने केली आहे. विहीर दुर्घटनेनंतर २९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एका चायनीज दुकानाला लागलेल्या आगीदरम्यान झालेल्या सिलिंडर स्फोटात कर्तव्यावर असलेले लिडिंग फायरमन जगन आमले यांचा मृत्यू झाला होता.
नेमणुकीबाबत प्रस्ताव तयार
विहिर दुर्घटनेची चौकशी सुरू असून शेलार आणि वाघचौडे यांच्या वारसांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केली आहे.
वाघचौडे यांच्या पत्नी दीपा यांचीअनुकंपातत्त्वावर महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर व रिक्त असलेल्या लिपिक टंकलेखक तथा संगणकचालक या पदावर नेमणूक प्रस्तावित आहे.
शेलार यांचा मुलगा जयेश शेलार याचीदेखील लिपिक तथा संगणकचालक या पदावर नेमणूक केली जाणार आहे.
दोघांचेही नेमणुकीचे प्रस्ताव तयार असून त्यांना वैद्यकीय तपासणी अहवाल, पोलिसांचा चारित्र्य पडताळणी दाखला सादर करण्यास सांगण्यात आले आहे.