जव्हार पोलीस स्टेशनच्या गणेशाचे थाटात विसर्जन

By Admin | Updated: September 29, 2015 00:57 IST2015-09-29T00:57:16+5:302015-09-29T00:57:16+5:30

आॅन ड्युटी २४ तास जनतेच्या सुरक्षिततेचा वसा घेऊन काम करीत असलेल्या पोलिसांना स्वत:च्या घरच्या सणावाराला जाण्यापेक्षा कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी महत्त्वाची वाटते.

Javar police station immersion in the custody of Ganesh | जव्हार पोलीस स्टेशनच्या गणेशाचे थाटात विसर्जन

जव्हार पोलीस स्टेशनच्या गणेशाचे थाटात विसर्जन

जव्हार : आॅन ड्युटी २४ तास जनतेच्या सुरक्षिततेचा वसा घेऊन काम करीत असलेल्या पोलिसांना स्वत:च्या घरच्या सणावाराला जाण्यापेक्षा कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी महत्त्वाची वाटते. मग, सणासुदीला घरी नसणाऱ्या पोलिसांची यावर उपाय म्हणून जव्हार पोलीस स्टेशन येथे बाल गणेश मंडळाच्या १० दिवसांचा उत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. पोलिसांचे कुटुंबीयदेखील आता या उत्सवात सहभागी होतात. रविवारी विसर्जनाच्या इतर मिरवणुका सुरू होण्याआधी सकाळीच जव्हार पोलिसांनी आपल्या गणपतीचे विसर्जन थाटामाटात केले.
विसर्जन मिरवणुकीत जव्हार पोलिसांनी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठतेचे भान ठेवत, बोगस पोलीस व सोनसाखळी चोरांपासून सावध राहा तसेच नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे फलक लावून सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडविले. अलीकडे वयोवृद्ध महिला दागिने घालून जात असताना धूम स्टाइलने सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी बाळगावी लागणारी सावधानता, पोलीस असल्याचे भासवून फसविणाऱ्यांचा संशय आल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा.
४नेटबँकिंगद्वारे फसवणूक होण्यापासून सावध राहण्याबाबत घ्यावी लागणारी गुप्तता, लहान मुले हरवल्यास तसेच चुकीच्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सामाजिक संदेशांचे फलक लावण्यात आले होते. २ तासांत बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन आटोपून पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाच्या बंदोबस्ताच्या तयारीत पोलीसदादा व्यस्त झाले. (वार्ताहर)
--------
ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष आणि ढोलताशांच्या गजरात रविवारी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायास निरोप दिला. गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी जिल्हाभरातील विविध विसर्जनस्थळांवर सुमारे ३१ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. तसेच निरोपही शांततेत दिला.
विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस यंत्रणेने चोख कामगिरी पार पाडली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ५०२ सार्वजनिक तर ५ हजार ७४९ घरगुती, तर ठाणे
पोलीस आयुक्तालयामध्ये ६६६ सार्वजनिक
आणि २४ हजार ६६ घरगुती बाप्पांना साश्रुनयनांनी निरोप दिला.
ठाणे, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी इको-फ्रेण्डली गणेशोत्सव संकल्पना राबवून गणेशमूर्ती विसर्जनाकरिता विशेष कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. त्या ठिकाणीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
--------
ठामपाने गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था केली. यामध्ये रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन नीळकंठ ग्रीन (टिकुजिनीवाडी) येथे कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. मासुंदा तलाव येथील दत्तघाट आणि अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व पर्यायी व्यवस्था केली होती. पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत, कोपरी येथे विसर्जन महाघाट, मानपाडा, कळवा आणि मुंब्रा यांच्यासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर, अंबरनाथ -बदलापूर अशा १०९ ठिकाणी विधिवत विसर्जनाची सोय केली होती.
---------
डोंबिवलीत योगाची प्रात्यक्षिके
डोंबिवली येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ६६ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाची श्रींच्या विसर्जनाच्या पारंपरिक मिरवणुकीत फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान बाप्पांना निरोप देण्यासाठी सालाबादप्रमाणे नगरवासीय आणि डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे या पारंपरिक मिरवणुकीला जेम्स व जॉयना या ब्रिटिश दाम्पत्यानेही हजेरी लावली होती. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योग विद्याधाम डोंबिवलीच्या योग पथकाने श्रीकांत देव, छाया लोहिया आणि आर.
कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० योग साधकांच्या योग पथकाने सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी भाविक मंत्रमुग्ध झाले तसेच साकारलेले मानवी मनोरेही सर्वांना भावले.
---------
भिवंडी : वर्षानुवर्षे शहरातील गणेशमूर्र्ती विसर्जन होत असलेल्या कामवारी नदीवर बांधलेल्या धरणात पाणी न साठल्याने या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनात अडचण निर्माण झाली. पात्रात झालेले अतिक्रमण आणि नदीतील गाळ वेळीच न काढल्याने रविवारी विसर्जनाच्या वेळी केवळ सहा फूट पाणी होते. त्यामुळे दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती विसर्जनात अडचणी निर्माण झाल्या. वास्तविक, धरणात पाणी साठविण्याचे काम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या लघुपाटबंधारे विभागाचे आहे. त्यांच्याकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. मनपा प्रशासनाने तातडीने कल्याणप्रमाणे विसर्जनाचे दोन तराफे बनवून कामवारी नदीत सोडल्याने सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करणे सुलभ झाले. पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण सार्वजनिक १३२ व खाजगी ३३६० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
--------
मीरा-भार्इंदरमध्ये दोन हजार मूर्तींचे विसर्जन
शहरातील पोलीस व स्थानिक प्रशासनाने दहा दिवसांच्या गणेश विसर्जनाचे सुनियोजन केल्याने सुमारे दोन हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन शांततेत पहाटे ५ वा.पर्यंत पार पडले. शहरात दीड दिवसापासून ते दहा दिवसांपर्यंतच्या बाप्पांच्या सुमारे १० हजारांहून अधिक मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी मूर्तींचे विसर्जन निर्धारित वेळेत व्हावे, यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने वेळोवेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती.
नेहमीप्रमाणे उंच मूर्ती उशिरानेच विसर्जनासाठी हलविण्यात आल्या. यंदा डीजेला बंदी घालण्यात आल्याने ढोलताशांच्या तालावरच अबालवृद्धांसह तरुणाई थिरकत होती. विसर्जनाचा सर्वात जास्त ताण भार्इंदर पश्चिमेकडील खाडी व पूर्वेकडील जेसल पार्क चौपाटीवर पडला होता. या ठिकाणी रात्री उशिरा सर्व उंच मूर्ती एकत्रच आल्याने विसर्जनासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे विसर्जनाला सोमवारची पहाट उजाडली. परिसरातील तलावांच्या ठिकाणी विसर्जन विभागल्याने अनेक खाजगी व घरगुती गणपतींचे त्या-त्या ठिकाणच्या तलावांत विसर्जन केले.
विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्यासह गणेश मंडळांच्या खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी विसर्जनाच्या मार्गावर खाद्यपदार्थांसह पेयजलाची मोफत व्यवस्था विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी केली होती. यात सुमारे १५ ते २० लाख रु. दरवर्षी खर्च होत असल्याचे परोपकार या सामाजिक संस्थेचे स्थानिक अध्यक्ष ओमप्रकाश गाडोदिया यांनी सांगितले.

Web Title: Javar police station immersion in the custody of Ganesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.