कथोरे यांची मतांची आघाडी तोडणे विरोधी पक्षांसाठी ठरणार आव्हानात्मक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 01:19 AM2019-09-07T01:19:55+5:302019-09-07T01:20:22+5:30

गेल्या १० वर्षात त्यांनी केलेल्या विकासकामांची चर्चा ही ठाणे जिल्ह्यातही रंगली.

It would be challenging for the opposition to break Kathore's lead | कथोरे यांची मतांची आघाडी तोडणे विरोधी पक्षांसाठी ठरणार आव्हानात्मक

कथोरे यांची मतांची आघाडी तोडणे विरोधी पक्षांसाठी ठरणार आव्हानात्मक

Next

पंकज पाटील 

मुरबाड : ग्रामीण आणि शहर असा दुहेरी संगम असलेल्या मुरबाड मतदार संघातील दोन निवडणुकींचा अंदाज घेतल्यावर या ठिकाणी राजकारण ज्या गतीने बदलले आहे तोच मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मुरबाड मतदारसंघावर दावा केला. त्यांच्या या दाव्यामुळे मुरबाडचे आमदार गोटीराम पवार यांची कोंडी झाली. मुरबाड मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर बदलापूर शहरी भाग आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीणचा काही भाग या मतदारसंघात टाकल्याने कथोरे यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन आमदारांमध्ये लागलेल्या उमेदवारीच्या शर्यतीत कथोरे यशस्वी झाले.

गेल्या १० वर्षात त्यांनी केलेल्या विकासकामांची चर्चा ही ठाणे जिल्ह्यातही रंगली. सोबत मुरबाड मतदारसंघात कथोरे प्रभावशाली ठरल्याने त्यांच्या मतांची आघाडी तोडण्यासाठी इतर राजकीय पक्षांना संघर्ष करावा लागत आहे. गेल्या निवडणुकीत युती नसतांनाही कथोरे यांनी २५ हजाराहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळविला होता. त्यातच गेल्या पाच वर्षात मुरबाडचा विकासाचा चेहरा ठाणे जिल्ह्याला दिसल्याने आता कथोरेंपुढे उमेदवारी घेण्यासाठीही कुणी पुढे येताना दिसत नाही. तर युती तुटेल या आशेवर काही आशावादी उमेदवार आपले नशीब अजमावण्याच्या प्रयत्नात आहेत.

पूर्वीच्या मुरबाडसंघाची पुनर्रचना २००९ मध्ये झाल्यावर या मतदार संघाला अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग आणि बदलापूर शहर जोडण्यात आले. त्यामुळे मुरबाड मतदारसंघ हा ग्रामीण आणि शहरी मतदारांचे केंद्र ठरले. मात्र या मतदारसंघावर गोटीराम पवार यांचे वर्चस्व असतानाही अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार कथोरे यांनी या मतदार संघावर दावा केला. पूर्वीच्या अंबरनाथ मतदारसंघातील बदलापूर शहर आणि अंबरनाथ ग्रामीण भाग या मतदारसंघात गेल्याने त्यांचा दावाही ग्राह्य धरण्यात आला. २००९ च्या निवडणुकीत कथोरे यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढविली होती. कथोरे यांना उमेदवारी मिळाल्याने माजी आमदार पवार यांनी बंडखोरी करत कथोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्या काळात मनसेचा जोरही जास्त असल्याने तत्कालीन शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मनसेत प्रवेश करत निवडणूक लढवली होती. तर भाजपच्या वतीने दिगंबर विशे हे निवडणूक रिंगणात होते. त्या निवडणुकीत कथोरे यांना ५५ हजार ८३० मते मिळाली तर गोटीराम पवार यांना ४९ हजार २८८ मते मिळाली. तर मनसेचे वामन म्हात्रे यांना ३७ हजार ८० मते मिळाली. तर भाजपचे विशे यांना २५ हजार २५८ मते मिळाली. त्या निवडणुकीत कथोरे यांनी पवार यांचा सहा हजार मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीनंतर कथोरे यांनी मुरबाडमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले. विकासकामांच्या जोरावर त्यांनी कार्यकर्त्यांची फळीही वाढवली. मात्र २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून कथोरे यांची काही नेते मुस्कटदाबी करत असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्र्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश होताच मुरबाड मतदारसंघातही भाजपची हवा सुरू झाली. राष्ट्रवादीत कार्यरत असलेले ७० टक्के कार्यकर्ते कथोरे यांच्यासोबत भाजपमध्ये आले. २०१४ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती तुटल्याने ही निवडणूक जड जाणार असे चित्र निर्माण झाले होते. तर दुसरीकडे पवार समर्थक राष्ट्रवादीतून कथोरेंचा विजयरथ रोखण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मतदारसंघात झालेले बदल, झालेली विकासकामे आणि मतदारसंघाला मिळालेली दिशा पाहता ही निवडणूक कथोरे यांच्या बाजूने झुकली.
या निवडणुकीत कथोरे यांना ८५ हजार ५४३ मते मिळाली तर राष्ट्रवादीचे पवार यांना ५९ हजार ३१३, शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना ५३ हजार ४९६ मते मिळाली. या निवडणुकीत कथोरे यांनी २५ हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. युती नसतानाही कथोरे यांना रोखता न आल्याने या मतदार संघातील इतर पक्षांची पकड सैल पडली आहे तर भाजप एकहाती सत्ता मिळविताना दिसत आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायती, मुरबाड नगर पंचायत आणि पंचायत समिती याही भाजपच्या ताब्यात आल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांना मुरबाड मतदारसंघातून चांगल्या मतांची आघाडी मिळाली आहे. मुरबाड मतदारसंघात भाजपला १ लाख २४ हजार ६३० मते मिळाली तर काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला ६० हजार ७०१ मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत खासदार पाटील यांच्या विरोधात नाराजी असतांनाही या मतदार संघात भाजपला चांगली मते मिळाली. त्यातच या निवडणुकीत सेना- भाजप एकत्रित असल्याने मताधिक्यही वाढले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा युती झाल्यास कथोरे यांना ही निवडणूक अपेक्षेपेक्षा सोपी होणार आहे. जर युती तुटली तर कथोरे यांना तिरंगी लढतीचा सामना करावा लागणार आहे.

किसन कथोरे यांची उमेदवारी निश्चित : मुरबाड मतदारसंघात शिवसेनेकडून वामन म्हात्रे, नगरसेवक शैलेश वडनेरे हे इच्छुक आहेत. तर नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले जिल्हा परिषदेचे उपसभापती सुभाष पवार यांनाही शेवटच्या क्षणी पुढे करण्याची शक्यता आहे. पवार यांचा शिवसेना प्रवेश हा नेमका विधानसभेच्या उमेदवारीसाठी आहे की जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासाठी आहे याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र युती झाल्यास याच इच्छुकांना युतीचा धर्म पाळत कथोरेंचे काम करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तर भाजपतर्फे आमदार कथोरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

... तर कॅप्टन आशिष दामले यांच्यावर जबाबदारी
राष्ट्रवादीतर्फे अद्याप सक्षम उमेदवार पुढे येत नसल्याने गोटीराम पवार की प्रमोद हिंदुराव यांना पुढे करण्याची शक्यता आहे. तर या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यास बदलापूरचे नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांच्यावर पुन्हा विधानसभा निवडणूक लढविण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसतर्फे चेहनसिंह पवार यांचे नाव पुढे केले जात आहे. मात्र आघाडी झाल्यास ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात जाण्याची शक्यता असल्याने काँग्रेस केवळ आपला दावा पुढे करत आहे.
 

Web Title: It would be challenging for the opposition to break Kathore's lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.