सामंजस्यातून वैर मिटविणे गरजेचे
By Admin | Updated: June 30, 2017 01:10 IST2017-06-30T01:10:10+5:302017-06-30T01:10:10+5:30
सामंजस्यातून वैर मिटविणे गरजेचे

सामंजस्यातून वैर मिटविणे गरजेचे
खेडी प्रगत झाल्याशिवाय देश प्रगतीपथावर आगेकूच करू शकणार नाही. निसर्गाची अनुकूल साथ मिळाली तर खेड्यातील गरीब व सर्वसामान्य शेतकरी काबाडकष्टातून, आपल्या शेतीतील उत्पादनांमधून सोनं प्राप्त करण्याची मनिषा बाळगू शकतो. दुर्दैवाने हाच शेतकरी बांधाची जमीन, शेतातील पीक किंवा भाऊबंदकीच्या वादातून कोर्टकचेरीच्या दुष्टचक्रात अडकतो. याचाच परिणाम म्हणून कुटुंब व्यवसाय व शेतीकडे दुर्लक्ष होऊन त्या शेतकऱ्याची प्रगती खुंटते. त्यामुळे आपापसातील मतभेद व वैरभावामुळे स्वत:ची कुटुंबाची व पर्यायाने सामाजिक हानी होण्यापेक्षा तंटा होऊच नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तंटा वा भांडण करता येत नाही, यासाठी नव्हे तर सामाजिक एकोपा क्षुल्लक कारणावरून दुभंगला जाण्यापेक्षा परस्पर सामंजस्यातून वैर मिटविण्यासाठी ‘महात्मा गांधी तंटामुक्त अभियान’चा प्रसार व प्रचार व्हायला हवा, असे मत रत्नागिरी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी ‘लोकमत’शी थेट संवादात बोलताना व्यक्त केले.
प्रश्न : तंटामुक्त अभियानाबाबत आपण काय सांगाल?
उत्तर : आम्हाला हिंसा करता येत नाही, म्हणून आम्ही अहिंसेचा अंगिकार केलेला आहे, यात मुळीच तथ्य नाही. हिंसेचा प्रतिकार अहिंसेच्या शस्त्राने प्रभावीरित्या करता येणे शक्य आहे, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रपिता महात्मा गांधी करत असत. आपापसातील मतभेद व वैरभावामुळे स्वत:ची, कुटुंबाची व पर्यायायाने सामाजिक हानी होण्यापेक्षा तंटा होऊच नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सामाजिक एकोपा क्षुल्लक कारणावरून दुभंगला जाण्यापेक्षा परस्पर सामंजस्यातून वैर मिटविण्यासाठी २००७ साली तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू करण्यात आले आहे.
प्रश्न : तंट्याची नेमकी कारणे काय सांगाल?
उत्तर : प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कायद्याचे ज्ञान हे अन्यायाविरूद्ध लढा देण्यासाठी अमृत ठरावे. परंतु, प्रत्यक्षात जमीन, पाणी व इतर हक्कांवरून सख्खे भाऊ तसेच शेजारी परस्परांचे वैरी बनतात. परस्परांमधील सुसंवादाचा अभाव, अहंकार आणि तथाकथित सामाजिक प्रतिष्ठा यामुळे माघार कोणी घ्यायची, यावर गाडे अडून बसते व त्याचाच वैरभाव वाढत जातो.
प्रश्न : पिढ्यान्पिढ्या हे वाद वाढतच राहण्याचे कारण काय?
उत्तर : दोन व्यक्तींमधील वैर प्रथम दोन कुटुंबात व नंतर समूह, जात, धर्म व सांप्रदायिक रूपात बदलत जाते. सुखासमाधानाने एकत्रित नांदणारी कुटुंब व गावे एकमेकांकडे संशयाने बघू लागतात. परस्परांचे नावसुद्धा न घेणे किंवा चेहरा न बघण्याइतपत द्वेष मनात भरतो. हाच द्वेष पुढील पिढ्यात वारसाहक्काने संक्रमित होत जातो. त्यामुळेच पिढ्यान्पिढ्या हे वाद सुरू रहात असल्याचे दिसून येते.
प्रश्न : या अभियानातून कोणत्या स्वरूपाचे तंटे मिटविण्यासाठी प्रयत्न केले जातात?
उत्तर : प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे असे या अभियानाचे तीन प्रमुख टप्पे आहेत. तीनही टप्प्यात या अभियानाला लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होणे अपेक्षित आहे. केवळ एक सरकारी योजना म्हणून नव्हे तर तंटामुक्त गावाच्या निर्मितीतून प्रगतीच्या राजमार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून तंटामुक्त गावांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येते.
प्रश्न : गाव तंटामुक्त होऊच नये, अशी मानसिकता आहे का?
उत्तर : गावांमध्ये निर्माण होणारे तंटे जमिनीच्या वादातूनच अधिक असतात. सुरूवातीला कवडीमोल वाटणाऱ्या जमिनीला आता सोन्याचा भाव आल्याने जमिनीच्या हक्कासाठी प्रत्येकजण भांडत आहे. त्यातूनच तंट्यांचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे.
प्रश्न : हे तंटे कमी होण्यासाठी नेमके काय करणे गरजेचे आहे?
उत्तर : लोकांची मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे. छोट्याशा वादातून द्वेषाची भावना वाढीला लागत आहे. त्यातूनच तंटे अधिक प्रमाणात घडत आहेत. तंटा हाच एकमेव पर्याय आहे, असेच सर्वांना वाटत आहे. लोकांमध्ये असलेला हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करून गावातील तंटे अधिकाधिक कमी करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.
प्रश्न : रत्नागिरी जिल्ह्यात अभियानाबाबत इतकी उदासिनता का?
उत्तर : मुळात कोकणातील बहुतांश जनता मुंबईसारख्या शहरात राहते. त्यामुळे गावी राहणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. गावातील तंटे सामोपचाराने मिटविण्यासाठी प्रयत्न करत असताना मुंबईस्थित व्यक्तींचा तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातही या अभियानाचे काम उत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न केले जातील. या अभियानातही आपला जिल्हा अग्रेसर राहिल्याचे दिसून येईल. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणाही राबवण्यात येईल. जिल्ह्यात अजूनही अनेक गावे तंटामुक्त होणे बाकी आहे, ही गावे तंटामुक्त होण्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता बदलून यासाठी त्यांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे.
- अरुण आडिवरेकर