सन २०४० पर्यंत इस्रो मानवाला चंद्रावर उतरविणार आहे - दा. कृ. सोमण
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 4, 2024 15:48 IST2024-03-04T15:47:52+5:302024-03-04T15:48:10+5:30
सोमण यांनी इस्रोवारीला आलेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. ठाणेमहानगरपालिकेचे आभार मानून ठाणे नगरीत लवकरात लवकर विज्ञानकेंद्र व्हावे अशी इच्छाही प्रकट केली

सन २०४० पर्यंत इस्रो मानवाला चंद्रावर उतरविणार आहे - दा. कृ. सोमण
ठाणे : इस्रोच्या गगनयानाविषयी चार अंतराळवीरांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून गगनयान अंतराळात ४०० कि.मीटर उंचीवर तीन दिवस भ्रमण करणार आहे. या यानाचे वजन ८२०० कि.ग्रॅम असून त्यामध्ये 'व्योममित्रा ' ही रोबोटकन्याही असणार आहे. सन २०३५ पर्यंत इस्रो अंतराळात इंडियन स्पेस स्टेशन उभारणार आहे. सन २०४० पर्यंत इस्रो मानवाला चंद्रावर उतरविणार आहे अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा.कृ.सोमण यांनी दिली.
ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील ३६ मुले नुकतीच इस्रोला भेट देऊन आली. या मुलांचा सत्कार माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी रविवारी कचराळी तलाव येथे विज्ञान कट्टा कार्यक्रमात केला. यावेळी विद्यार्थ्यानी इस्रोभेटीत आपल्याला नवीन काय शिकायला मिळाले ते सांगितले. त्यामुळे खगोल विज्ञान विषयाची गोडी निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी ठाणे महानगरपालिकेचे आणि मराठी विज्ञान परिषदेचे आभार मानले.
या कार्यक्रमाला पालक, शिक्षक आणि इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी सोमण यांनी मुलाखतीत इस्रो सर्व मोहिमा कमीतकमी खर्चात करीत आहे. इतर देशांचे उपग्रह अंतराळात पाठवून परकीय चलन मिळवत आहे. भारताच्या संरक्षण आणि हवामान खात्याला इस्रोची मोठी मदत होत असते. सोमण यांनी इस्रोवारीला आलेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. ठाणेमहानगरपालिकेचे आभार मानून ठाणे नगरीत लवकरात लवकर विज्ञानकेंद्र व्हावे अशी इच्छाही प्रकट केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोर्डे यांनी केले. त्यांनी विद्यार्थी आणि मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सोमण यांच्या मुलाखती घेतल्या.
इस्रोचे राॅकेट लान्चिंग दर महिन्याच्या तिस-या बुधवारी आयोजित केले जाते. तेथे मोबाइल नेण्यावर बंदी आहे. एकूण अंदाजे सात हजार विद्यार्थी, पालक, शिक्षक या दिवशी उपस्थित होते. ठाणे नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी तेथे नोटस् काढल्या. आनंदित होऊन गाणी म्हटली असे अनुभव सोमण यांनी उपस्थितांसमोर कथन केले.