मनोरमधील आयआरबी कंपनीचा डांबर प्लांट विनापरवाना सुरू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 23:52 IST2020-06-14T23:52:30+5:302020-06-14T23:52:34+5:30
अहवाल तहसीलदारांकडे : परवानगीची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा

मनोरमधील आयआरबी कंपनीचा डांबर प्लांट विनापरवाना सुरू?
मनोर : पालघर तालुक्यातील वाडे येथील आयआरबी कंपनीचा एक प्लांट गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही परवानगी न घेता सुरू असल्याची माहिती उघड झाली आहे. यासंदर्भात कंपनीच्या प्रतिनिधीने परवानगीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले, तर तहसीलदारांना अहवाल पाठवल्याची माहिती महसूल विभागाच्या मंडलाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे सहापदरी रस्त्याचे काम सुरू केल्यापासून वाडे येथील आयआरबी कंपनीचा हा डांबर प्लांट सुरू आहे. आधी परवानगी घेऊन काम सुरू होते, परंतु २०१८ पासून त्याची मुदत संपली आहे, मात्र तरीही गेल्या दोन वर्षापासून तो सुरू आहे. आतापर्यंत डांबरमिश्रित खडीच्या लाखो ब्रास मटेरियलचे उत्पादन झाले असून महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थ विष्णू उराडे यांनी या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्या वेळी विरोध करणाºयांचे जबाबही घेण्यात आले होते. त्यामध्येही मुदत संपली असल्याचे नमूद केले असून ते रिपोर्ट मनोर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले होते. मात्र जैसे थे परिस्थिती राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्लांट सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढीची पुढील कारवाई सुरू आहे. रस्त्याची कामे सुरू असल्याने हा प्लांट सुरू ठेवण्यात आलेला आहे.
- प्रवीण भिंगारे, लायसनिंग मॅनेजर, आयआरबी कंपनी
आयआरबीच्या व्यवस्थापकाला अनेक वेळा प्लांट बंद करण्यासाठी सांगितले. लेखी नोटीसही दिली, तरीसुद्धा त्यांनी चालूच ठेवला आहे. आम्ही तिकडे गेलो की आम्हाला दाखवण्यासाठी बंद केला जातो. आम्ही निघाल्यानंतर पुन्हा सुरू होतो. याबाबत तहसीलदारांना रिपोर्ट पाठवला आहे.
- संदीप म्हात्रे, मंडलाधिकारी, महसूल विभाग