महापौरांकडून कोविड वाॅर रूमची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST2021-04-03T04:37:18+5:302021-04-03T04:37:18+5:30
ठाणे : कोविड १९ च्या काळात बाधित रुग्णांना तत्काळ माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने मागील वर्षी सुरू केलेल्या अद्ययावत ...

महापौरांकडून कोविड वाॅर रूमची पाहणी
ठाणे : कोविड १९ च्या काळात बाधित रुग्णांना तत्काळ माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने मागील वर्षी सुरू केलेल्या अद्ययावत अशा मध्यवर्ती कोविड वॉर रूमची महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी पाहणी करून तेथील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाॅर रूम कार्यान्वित केली आहे. या माध्यमातून गेले वर्षभर कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातील बेडच्या उपलब्धतेबाबत तत्काळ माहिती देऊन त्यांना आवश्यक मदत केली जात आहे.
या पाहणीदरम्यान नगरसेवक विकास रेपाळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर, डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.
मागील वर्षात कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांना आपण कुठे जायचे, कोणते औषधोपचार घ्यायचे, कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याबाबत संभ्रम निर्माण होत होता. यासाठी महापालिकेने सेंट्रल कोविड वॉर रूमची उभारणी हाजुरी येथे अत्यंत कमी कालावधीत केली. उपलब्ध होणारी माहिती अद्ययावत करण्यासाठी १५ ते २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर सदर रुग्णास कोणत्या प्रकारच्या उपचारांची तसेच रुग्णालयातील बेडची उपलब्धता पाहून त्यांना योग्य व्यवस्था पुरविण्याचे काम करण्यात येत आहे. रुग्णालयात दाखल करण्याच्या वेळेनुसार रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जात असल्याने अत्यंत कमी वेळेत रुग्ण रुग्णालयात दाखल होऊन त्याच्यावर उपचार होण्यास मदत होत आहे. यासाठी कोविड गार्डचीदेखील नियुक्ती केली आहे. ठाणे जिल्ह्यातील रुग्णांनादेखील खाजगी व शासकीय रुग्णालयातील बेड उपलब्धतेबाबत सहजरीत्या माहिती उपलब्ध होत असल्यामुळे महापालिकेने सुरू केलेल्या वॉर रूमबाबत सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या वॉररूममध्ये गेल्या वर्षभरापासून डॉ. माधवी देवल या प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तर डॉ. भरत कोलते, डॉ. गोविंद निगुडकर, डॉ. आशिष सिंग हे सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. तर वॉररूमच्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून डॉ. खुशबू टावरी या काम पाहत आहेत. या वॉररूममध्ये एकूण १० दूरध्वनी नंबर कार्यान्वित केलेले आहेत.