शहराच्या फुप्फुसावरच महापालिकेचा घाला
By Admin | Updated: February 11, 2017 03:48 IST2017-02-11T03:48:40+5:302017-02-11T03:48:40+5:30
शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील तब्बल ७० झाडांची कत्तल करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे

शहराच्या फुप्फुसावरच महापालिकेचा घाला
मीरा रोड : शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील तब्बल ७० झाडांची कत्तल करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. सर्व्हिस रोड बनवण्यासाठी ही झाडे तोडण्याचे कारण पुढे केले जात असले, तरी येथील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे व मोठ्या होर्डिंग्जवर कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या विकास आराखड्यात काशिमीरानाका ते भार्इंदरच्या सावरकर चौकापर्यंतचा असलेला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा ४५ मीटरचा आहे. परंतु, पालिकेने हा रस्ता विकसित करताना तो केवळ १२० फुटांचाच केला. मुख्य रस्ता व जवळ नाला बांधला. पण, दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० फुटांचा सर्व्हिस रोड पालिकेने तयार केलाच नाही. त्याविरोधात २००७ मध्ये डॉ. सुरेश येवले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी महापालिकेने न्यायालयात तीन महिन्यांत सर्व्हिस रोड बांधू, असे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
आज १० वर्षे झाली, तरी पालिकेने सर्व्हिस रोड बांधला नाही. अतिक्रमणही हटवले नाहीत. याचिकाकर्ते डॉ. येवले सातत्याने महापालिकेकडे सर्व्हिस रोड बांधण्याची मागणी सातत्याने करत आहेत. सध्या या रस्त्यावर गॅरेजवाले, गाड्या विक्री करणारे तसेच हातगाड्यावाल्यांनी बेकायदा अतिक्रमण केले आहे. शिवाय, दुतर्फा बेकायदा पार्किंग होत आहे. महापालिकेकडून त्यावर ठोस कारवाई झालेली नाही.
पालिकेने दोन्ही बाजंूना १० फुटांचा सर्व्हिस रोड बांधण्यासाठी निविदा काढली आहे. त्यासाठी ३ कोटी ५६ लाख खर्च येणार आहे. हा रोड बांधताना तीन ठिकाणी एमएमआरडीएच्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या ठिकाणी सर्व्हिस रोड नंतर बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सर्व्हिस रोडसाठी अतिक्रमणे, होर्डिंग्ज न हटवता ७० मोठी झाडे तोडण्याचे काम सुरू केले आहे. आयुक्तांच्या अखत्यारीतच हे अधिकार असल्याने झाडे तोडण्यास त्यांनीच मंजुरी दिलेली आहे. आधी अतिक्रमण हटवा, नंतर गरज पडल्यास झाडे पाडा, अशी तक्रार मनसे वाहतूक शखेच्या संतोष शाह यांनी पालिकेकडे केली आहे. झाडे तोडण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)