अवैध प्रवासी बसवर दुसऱ्या दिवशीही कारवाई
By Admin | Updated: December 23, 2016 02:57 IST2016-12-23T02:57:58+5:302016-12-23T02:57:58+5:30
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी तसेच स्कूल बसेससह अन्य खाजगी वाहनांवर दुसऱ्या दिवशीही ठाणे प्रादेशिक परिवहन

अवैध प्रवासी बसवर दुसऱ्या दिवशीही कारवाई
ठाणे : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी तसेच स्कूल बसेससह अन्य खाजगी वाहनांवर दुसऱ्या दिवशीही ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा सुरूच ठेवला. बुधवारी आणि गुरुवारी आरटीओ विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे दीड लाखाचा दंड आकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नियमांचे उल्लंघन करून शहरातील विविध भागांत अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याने त्याविरोधात बुधवारपासून ठाणे आरटीओने शहरात विशेष मोहीम हाती घेतली. यासाठी आरटीओची पाच वायुवेग पथके तैनात केली आहेत. पहिल्या दिवशी केलेल्या कारवाईत आरटीओने ५५ वाहनांवर कारवाई केली. त्यापैकी ४२ वाहने जप्त केली आहेत. तसेच गुरुवारच्या कारवाईतही आरटीओने ४५ वाहने जप्त करून ती साकेत मैदानात ठेवली आहेत. यातील २० गाड्यांचे परवाने ९० दिवसांसाठी निलंबित केले. तर १० स्कूल बसने नियमांचे उल्लंघन करण्याबरोबर सुरक्षेकडेही कानाडोळा केल्याचे उघड झाले आहे. कोपरी आणि घोडबंदर रोडवर १० बस अवैध वाहतूक करताना आढळल्या. ही कारवाई आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही आणि सहा. परिवहन अधिकारी जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)