अन्याय : गुरुजींचा लेझीम मोर्चा
By Admin | Updated: November 9, 2015 02:40 IST2015-11-09T02:40:03+5:302015-11-09T02:40:03+5:30
युती शासनाने राज्यातील कला, क्रीडा व संगीत शिक्षकांच्या तसेच विशेष शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पदांना कात्री लावणारा अन्यायकारक निर्णय घेतला

अन्याय : गुरुजींचा लेझीम मोर्चा
पालघर : युती शासनाने राज्यातील कला, क्रीडा व संगीत शिक्षकांच्या तसेच विशेष शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पदांना कात्री लावणारा अन्यायकारक निर्णय घेतला. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाशी संलग्न असलेल्या तीन अन्य संघटनांतील शेकडो शिक्षकांनी ढोल, ताशे, लेझीमच्या गजरात पालघर हुतात्मा स्तंभ ते शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत अनोखा मोर्चा काढला.
भाजपा-सेना युतीच्या सरकारने राज्यातील कला-क्रीडा व संगीत शिक्षकांच्या तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना कात्री लावणारे अत्यंत अन्यायकारक शासन निर्णय घेतले आहेत. या परिपत्रकाप्रमाणे राज्याचे शैक्षणिक धोरण खासगीकरणाकडे वाटचाल करणारे आणि बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणारे असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे शिक्षणाचा कणा समजले जाणारे कला, क्रीडा आणि संगीत शिक्षण हद्दपार होणार आहे. अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण होणार आहे.
या वेळी ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष योगराज शिरसाठ, जिल्हा क्रीडा संघाध्यक्ष अजय राऊत, जिल्हा कलाध्यापक संघ अध्यक्ष प्रफुल्ल घरत, संस्था संचालक संघटना अध्यक्ष वागेश कदम, कार्यवाह पी.एस. पाटील,
कार्याध्यक्ष संतोष पावडे, पतपेढी अध्यक्ष पी.टी. पाटील व कार्यवाह गणेश प्रधान, प्रकाश वर्तक, लक्ष्मण शेडके आदी उपस्थित होते.
शेकडो शिक्षकांनी लेझीम मोर्चाद्वारे शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचून आपला निषेध व्यक्त करून निवेदनही सादर केले. (वार्ताहर)