ठाण्यातील रिक्षांमधून हरवली चालकांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:20 AM2021-01-03T01:20:52+5:302021-01-03T01:21:05+5:30

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : पोलिसांचे दुर्लक्ष

Information of lost drivers from rickshaws in Thane | ठाण्यातील रिक्षांमधून हरवली चालकांची माहिती

ठाण्यातील रिक्षांमधून हरवली चालकांची माहिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे   :  ठाण्यातील रिक्षांमधून प्रवाशांचा विशेष करून महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, याकरिता चार वर्षांपूर्वी प्रत्येक रिक्षामध्ये त्या चालकाची संपूर्ण माहिती छायाचित्रसह लावणे बंधनकारक केले होते, परंतु आजघडीला अनेक रिक्षांमध्ये ती नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात शहरात नव्याने ज्या रिक्षांची भर पडलेली आहे, त्यामध्ये हे प्रमाण अधिकच असल्याचे आहे. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे, यातील अनेक रिक्षाचालकांकडे चालकपरवाना परमीट आधीच नसल्याने ते माहितीच ठेवत नसल्याची बाबही समोर आली आहे.


एकीकडे टीएमटीच्या अपु:या बसमुळे प्रवाशांची गैरसोय होते, तर दुसरीकडे प्रवासी पर्याय म्हणून ज्या रिक्षांकडे पाहतात, ते रिक्षाचालक त्यांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक देतात. अशा वेळी प्रवाशांनी कुठे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, महिला प्रवासी तर अक्षरश: रडकुंडीला येत आहेत. 


ठाणे शहरात रिक्षाचालक आपल्या मर्जीनुसार रिक्षा चालवतात. रिक्षासेवा ही सामाजिक परिवहन सेवा असल्याचे भान नसल्यामुळे अनेक रिक्षाचालक रिक्षा रिकामी चालली असताना, गरजूंनी ती थांबविण्याचा इशारा केला असतानाही ते थांबवत नाहीत.


रिक्षा थांबविली तर प्रवाशाने जाण्याचे ठिकाण संगितल्यावर त्या ठिकाणी जाण्यास नकार देणे, आजारी, अपंग, ज्येष्ठ नागरिक महिला यांच्याबाबत असंवेदनशील पद्धतीने व्यवहार करणे, जवळचे भाडे नाकारणे, स्टेशनकडील मुख्य रांगेत न जाता स्टेशनच्या बाहेरील परिसरात उभे राहून विशिष्ट भागात जाण्यासाठी वेगळे स्टॅण्ड तयार करणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, रस्त्याच्या उलट्या दिशेने रिक्षा चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे अशा रिक्षांच्या संदर्भातील अनेक समस्यांना ठाणेकरांना सामोरे जावे लागते. पाेलिसांनी या प्रश्नी लक्ष घालावे अशी ठाणेकरांची मागणी आहे.

रश्मी करंदीकर यांनी केली होती माहितीची सक्ती
काही वर्षांपूर्वी ठाण्यात कापूरबावडी परिसरात एका युवतीशी एका रिक्षाचालकाने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिने चालत्या रिक्षातून उडी घेत स्वत:चा बचाव केला होता. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. यानंतर, ठाण्यात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी तत्कालीन पोलीस वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी प्रत्येक रिक्षामध्ये त्या त्या रिक्षाचालकांचा फोटो बॅच नंबर परवानाची माहिती त्याचा संपूर्ण पत्ता अशी माहिती चालकाच्या मागच्या बाजूला असणे बंधनकारक केले होते. त्यावेळी अनेक रिक्षाचालकांनी त्याला प्रतिसादही दिला होता, परंतु आता या रिक्षांमधील ही माहिती गायब झाली आहे.

माहिती एक, चालक दुसराच 
माहिती गायब होण्याचे मुख्य कारण म्हणजे यातील बहुतांशी रिक्षाचालकांकडे वाहनपरवाना आधीच नसतो, त्यामुळे ते कोणती माहिती देणार हाच मुळात प्रश्न आहे. त्यातही ज्या रिक्षांमध्ये अशा प्रकारची माहिती असते, त्यात अनेक वेळा दुसरेच चालक असतात. यातील बहुतांशी रिक्षाचालक हे तर परराज्यातील आहेत. त्यांना अनेक वेळा ठाण्यातील मार्गही माहित नसतात, अशा वेळी प्रवाशांची पंचाईत होते आणि त्यातून वाद निर्माण होतात, त्यामुळे आता ठाणे वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षांची कसून तपासणी करणे गरजेचे आहे.

Web Title: Information of lost drivers from rickshaws in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.