आॅप्टीकल फायबरची माहिती गुलदस्त्यात
By Admin | Updated: November 15, 2016 04:24 IST2016-11-15T04:24:40+5:302016-11-15T04:24:40+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा भुयारी आॅप्टीकल केबल टाकण्यात आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या केबल नेमक्या कुठे

आॅप्टीकल फायबरची माहिती गुलदस्त्यात
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा भुयारी आॅप्टीकल केबल टाकण्यात आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या केबल नेमक्या कुठे टाकल्या आहेत, याची माहिती कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिकेकडे मागितली होती. मात्र, ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिकेला फेब्रुवारीपासून चार वेळा स्मरणपत्र दिले. परंतु, कोणतीच माहिती मिळालेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
मोबाइल आणि इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांनी खोदकाम करत महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात भुयारी आॅप्टीकल केबल टाकल्या आहेत. मात्र, या केबल बेकायदा टाकल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यामुळे त्याची माहिती गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे मागितली आहे. परंतु, काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्या नावे २९ फेब्रुवारी, २८ एप्रिल, ४ आणि १२ आॅगस्टला स्मरणपत्रे दिली आहेत. त्यानंतर १४ सप्टेंबरला त्यांनी पुन्हा पत्र दिले. त्यात महापालिकेने कंपन्यांना कोणत्या भागात भुयारी आॅप्टीकल फायबर केबल टाकण्याची परवानगी दिली आहे, ती देताना कंपन्यांनी पालिकेकडे सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यप्रत, जर परवानगी दिली असेल तर त्या कंपनीला किती किलोमीटरपर्यंतची परवानगी दिली आहे, महापालिकेने आजपर्यंत किती कंपन्यांवर बेकायदा काम केल्याबद्दल कारवाई केली आहे, केली असल्यास कोणत्या स्वरूपाची कारवाई केली आहे. तसेच केबल टाकण्यासाठी खोदलेले खड्डे बुजवण्याच्या अटी-शर्ती आहेत का, अशी माहिती मागवली आहे.
गायकवाड नऊ महिन्यांपासून महापालिकेकडे ही माहिती मागत आहेत. मात्र, ती देण्यास टाळाटाळ का होत आहे, त्यात कोणाचे साटेलोटे आहे का, असे सवाल त्यांनी केले आहेत. दरम्यान, पालिका गायकवाड यांच्या अर्जांना केराची टोपली दाखवली जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)