रुग्णांना चक्क इंडस्ट्रियल ऑक्सिजन; मुरबाडच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जीवघेणे उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:16 IST2019-09-11T00:16:35+5:302019-09-11T00:16:42+5:30
मुरबाड भागात अनेक खाजगी हॉस्पिटल्स असून तिथे रु ग्णांवर वेगवेगळ्या शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध असल्याच्या जाहिराती ठिकठिकाणी केल्या आहेत.

रुग्णांना चक्क इंडस्ट्रियल ऑक्सिजन; मुरबाडच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जीवघेणे उपचार
मुरबाड : केवळ पैसे वाचवण्यासाठी रुग्णांना मेडिकल ऑक्सिजन देण्याऐवजी इंडस्ट्रियल आॅक्सिजन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाडच्या श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असून, संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या गंभीर प्रकाराचे खापर सहकारी कर्मचाऱ्यांवर फोडले आहे.
मुरबाड भागात अनेक खाजगी हॉस्पिटल्स असून तिथे रु ग्णांवर वेगवेगळ्या शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध असल्याच्या जाहिराती ठिकठिकाणी केल्या आहेत. मात्र उपचाराच्या नावाखाली या हॉस्पिटल्समध्ये गंभीर गैरप्रकार सुरु असल्याचे उघड झाले आहे. रुग्णांना बरेचदा कृत्रिम प्राणवायू (आॅक्सिजन) देण्याची गरज भासते. त्यासाठी मेडिकल आॅक्सिजन सिलिंडरचा वापर केला जातो. याशिवाय बाजारपेठेत इंडस्ट्रियल आॅक्सिजन सिलिंडरही उपलब्ध असतात. या सिलिंडरचा वापर मुख्यत्त्वे वेल्डिंगसाठी केला जातो. मेडिकल आॅक्सिजन सिलिंडरच्या तुलनेत इंडस्ट्रियल आॅक्सिजन सिलिंडर स्वस्त असतात. त्यामुळे स्वत:चा नफा वाढवण्यासाठी काही हॉस्पिटल रुग्णांना चक्क इंडस्ट्रियल आॅक्सिजन देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तज्ज्ञांच्या मते, इंडस्ट्रियल आॅक्सिजन सिलिंडर दिल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांचे आयुर्मान घटण्याची दाट शक्यता असते. मुरबाड शहरातील म्हसा रोडवर असलेल्या श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असाच प्रकार उघडकीस आल्याने डॉक्टरांवर कारवाईची मागणी जोर होत आहे.
हॉस्पिटलमधील मेडिकल ऑक्सिजन संपल्यावर माझ्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांनी इंडस्ट्रीयल ऑक्सिजन सिलेंडर आणले होते. - डॉ. विश्वनाथ पवार, श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मुरबाड
मेडिकल ऑक्सिजनऐवजी इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा रूग्णांसाठी वापर करणे हे अत्यंत धोकादायक आहे. - डॉ. श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी, मुरबाड