भारत-रशियातील व्यापार संबंध विस्तारणे गरजेचे!
By Admin | Updated: November 15, 2016 04:13 IST2016-11-15T04:13:56+5:302016-11-15T04:13:56+5:30
भारत आणि रशिया हे दोनही देश दीर्घकालीन मित्र असले तरी या दोन देशां दरम्यान व्यापार व उद्योग विषयक अल्पसंबंध लक्षात घेता या दोन्ही देशांमधील

भारत-रशियातील व्यापार संबंध विस्तारणे गरजेचे!
पालघर : भारत आणि रशिया हे दोनही देश दीर्घकालीन मित्र असले तरी या दोन देशां दरम्यान व्यापार व उद्योग विषयक अल्पसंबंध लक्षात घेता या दोन्ही देशांमधील व्यापार विषयक संबंध विस्तारणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत आॅब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुधींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठ आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात व्यक्त केले.
रशियातील बोल्शेविक क्रांतीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या पाशर््वभूमीवर रशिया आणि युरोशियन विभागातील देशांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मध्य युरोशिया अभ्यास केंद्र, मुंबई विद्यापीठ आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ व ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन सोमवारी फिरोजशहा मेहता भवन, मुंबई विद्यापीठ, सांताक्रुेझ येथे रशियन फेडरेशनचे कौन्सिल जनरल अँड्रे झलित्सोव, मुंबईतील रशियन सेंटरचे संचालक व्लादीमीर दीमेंटिव, आॅब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुधींद्र कुलकर्णी, मेजर जनरल अनिलकुमार शुक्ला, युरोशियन अभ्यासकेंद्राचे प्रमुख डॉ. संजय देशपांडे आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळींचे अध्यक्ष अँड. जी.डी.तिवारी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी चंद्रकांत दांडेकर, सचिव प्रा. अशोक ठाकूर आणि कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, सहसचिव जयंत दांडेकर उपस्थित होते.
समारोप अँड्. जी. डी. तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी ३.३० वा. झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अध्यक्ष अजय पटनाईक उपस्थित होते. त्यांनी राज्यव्यवस्था, व्यापार आणि आशिया खंडातील परिस्थिती यावर भाष्य करताना बदलत्या जागतिक परिस्थितीत निर्माण झालेल्या आव्हानांचा आढावा घेऊन मध्य आशियातील निर्वासितांच्या समस्यांवर भाष्य केले. या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये भारतासह रशिया, त्रिनिनाद, अझरबैजान, इराण, बेलारूस इ. अनेक देशातील विचारवंत व तज्ज्ञ सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा. महेश देशमुख यांनी केले. हा परिसंवाद यशस्वी करण्यासाठी प्रा. देशमुख, डॉ. किरण पाटील, प्रा. विवेक कुडू, डॉ. बी.बी.रहाणे, प्रा. रामदास येडे, डॉ. मनिष देशमुख यांनी सहकार्य केले.
(प्रतिनिधी)