डोंबिवलीत स्वतंत्र रिक्षा प्रवास १ रुपयाने महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:23+5:302021-02-24T04:41:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा भाड्यात ३ रुपयांची वाढ जाहीर केल्याने पहिल्या टप्प्यासाठी ...

डोंबिवलीत स्वतंत्र रिक्षा प्रवास १ रुपयाने महागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा भाड्यात ३ रुपयांची वाढ जाहीर केल्याने पहिल्या टप्प्यासाठी आता १८ ऐवजी आता २१ रुपये मोजावे लागणार आहेत. येथील रिक्षाचालक तसेही पहिल्या टप्प्यासाठी २० रुपये आकारायचे. त्यामुळे डोंबिवलीकरांना नियमानुसार स्वतंत्र रिक्षा प्रवासासाठी २० ऐवजी १ रुपया जादा द्यावा लागेल.
काही वर्षे डोंबिवलीकर पहिल्या टप्प्यासाठी मीटर नसताना स्वतंत्र रिक्षा केली तर २० रुपये मोजत होते. त्यात आता १ रुपया वाढणार असल्याचे लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमासकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शेअर भाड्यात पहिल्या टप्प्यासाठी आता जे १० रुपये आकारले जातात, त्यात वाढ होणार नसल्याचे ते म्हणाले. परंतु लांबच्या टप्प्यात काहीशी वाढ होण्याची शक्यता असून त्याबाबत आरटीओने सर्व्हे करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. २०१४ पासून रोखून धरलेली प्रलंबित व कायदेशीर हक्काची रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ दिल्याबद्दल लालबावटा रिक्षा युनियनतर्फे या भाववाढीचे स्वागत करण्यात आले.
२०१४ पासून सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांना भाडेवाढ दिली नव्हती. सर्व वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. फक्त रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ रोखण्यात आली होती. रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत हकिम समिती व खटुआ समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारलेल्या असताना सरकारने आठ वर्षे रिक्षा-टॅक्सीची भाववाढ रोखून धरली होती. आठ वर्षे महाराष्ट्रातील विविध रिक्षा-टॅक्सी संघटना या भाववाढीची मागणी करत होत्या.
२०२० मध्ये लाॅकडाऊनमुळे सहा महिने रिक्षा-टॅक्सी पूर्णपणे बंद होत्या. सहा महिन्यांनंतर सुरू करूनही ट्रेन, शाळा, काॅलेज आदी बंद असल्याने रिक्षा-टॅक्सींचा पन्नास टक्के धंदा कमी झाला होता. एक महिन्यापासून थोड्या प्रमाणात ट्रेन, शाळा, कॉलेज सुरू झाले तरीही धंदा पूर्वीसारखा होत नसे. त्यातच आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने भाडेवाढ होऊनही रिक्षा-टॅक्सीचालकांना काही महिने पोटभर धंदा मिळेल का, याबाबत प्रश्नच असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून रिक्षा, टॅक्सीचालक, मालक सावकारी कर्जात मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. वित्त कंपनीच्या गुंडांनी कर्जदार रिक्षाचालकांना धंदा करणे व जगणे मुश्कील केले आहे.
रिक्षा-टॅक्सीचालकांच्या अशा वाईट परिस्थितीत २०१४ पासूनची प्रलंबित व कायदेशीर हक्काची भाववाढ देऊन सरकारने रिक्षाचालकांना फार मोठा दिलासा देऊन भाडेवाढीचा प्रश्न सोडविला आहे. याबद्दल अनिल परब यांचे डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी आभार मानले.