Inauguration of flyover twice in one day in bhiwandi | उड्डाणपुलाचे एकाच दिवसात दोनवेळा उद्घाटन
उड्डाणपुलाचे एकाच दिवसात दोनवेळा उद्घाटन

भिवंडी : भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका उड्डाणपुलाचे सोमवारी एकाच दिवशी दोनदा उद्घाटन झाले. सकाळी संतप्त नागरिकांनी जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारांवर नारळ फोडून उद्घाटन केले, तर सायंकाळी ५ वाजता भिवंडीचे खा. कपिल पाटील यांनी त्याच उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. सकाळीच या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने अधिकारी व भाजपच्या नेत्यांची पंचाईत झाली.

मुंबई-नाशिक बायपास भिवंडी-कल्याण महामार्गावरील रांजनोली चौकातील पुलाचे उद्घाटन उड्डाणपूल तयार होऊनही गेल्या महिनाभरापासून रखडले होते. निवडणुकीपूर्वी काम पूर्ण होऊनही, केवळ बड्या सत्ताधारी नेत्यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याचा योग जुळून येत नसल्याने एमएमआरडीएने पूल वाहतुकीकरिता खुला केला नव्हता. त्यामुळे या महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या जैसे थे होती. भिवंडी पूर्व विधानसभेचे आ. रईस शेख यांच्यासह ग्रामस्थांनी हा उड्डाणपूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली होती. मात्र, त्याकडे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी शासकीय अधिकारी व पोलिसांना कोणतीही माहिती न देता रांजनोली उड्डाणपुलावर जाऊन नारळ फोडून उद्घाटन केल्याचे जाहीर केले. या अनौपचारिक उद्घाटनाची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्याने तालुक्यात खळबळ माजली. मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी-रांजनोली चौकात प्रवासी वाहतूककोंडीने हैराण आहेत. एमएमआरडीएने रांजनोली येथील हा उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, कंत्राटदाराच्या बेफिकिरी व संथगती कारभारामुळे काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे या परिसरात कित्येक महिने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत होती. आता गेल्या महिनाभराहून अधिक काळ पुलाचे काम पूर्ण होऊनही तो बंद ठेवला होता. त्यामुळे वाहतूककोंडीत अडकणारे प्रवासी प्रशासनाच्या नावाने बोटं मोडत होते.

उड्डाणपुलाच्या मागणीसाठी २०१३ पासून स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यामुळे हा उड्डाणपूल मंजूर झाला. मात्र, कोणत्याही एका नेत्याने या उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय घेऊ नये, यासाठी सोमवारी आम्ही या पुलाचे उद्घाटन केले आहे, अशी प्रतिक्रिया जय आगरी सेवा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी दिली. येथील नेत्यांना केवळ उद्घाटनाचे नारळ फोडायचीच माहिती आहे, अशी टीकाही पाटील यांनी खा. कपिल पाटील यांचा नामोल्लेख न करता केली.

Web Title: Inauguration of flyover twice in one day in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.