वादग्रस्त कार्यालयाचे उदघाटन

By Admin | Updated: February 13, 2017 04:54 IST2017-02-13T04:54:32+5:302017-02-13T04:54:32+5:30

२७ गावांच्या समावेशानंतर केडीएमसीच्या प्रभागांमध्ये भर पडलेल्या ‘ई’ प्रभाग कार्यालयाचे नवे कार्यालय येथील दावडी परिसरातील रिजन्सी गार्डनमधील प्रशस्त

The inauguration of the disputed office | वादग्रस्त कार्यालयाचे उदघाटन

वादग्रस्त कार्यालयाचे उदघाटन

डोंबिवली: २७ गावांच्या समावेशानंतर केडीएमसीच्या प्रभागांमध्ये भर पडलेल्या ‘ई’ प्रभाग कार्यालयाचे नवे कार्यालय येथील दावडी परिसरातील रिजन्सी गार्डनमधील प्रशस्त जागेत थाटण्यात आले. स्थानिक आणि सर्वपक्षीय युवा यांच्या प्रखर विरोधानंतरही रविवारी या वादग्रस्त कार्यालयाचा शुभारंभ शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दांडी मारली. तसेच उद्घाटन प्रसंगी वाद उद्भवल्याचे समजताच आयुक्त ई. रवींद्रन आणि अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी कार्यक्रमाला जाणे टाळले. तर, सभागृहनेते राजेश मोरे आणि स्थानिक पदाधिकारी वगळता महापालिकेच्या अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाला न जाणेच पसंत केले.
१ जून २०१५ ला २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत झालेल्या समावेशानंतर त्या गावांचा प्रशासकीय कारभार चालवण्यासाठी ९ जून २०१५ रोजी ई प्रभागाची निर्मिती करण्यात आली. ई प्रभाग कार्यालयाची डोंबिवली क्रीडासंकुलातील जागा अपुरी पडत असल्याने दावडी गावातील रिजन्सी गार्डन परिसरातील जागेत हे कार्यालय हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, रविवारी या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु, ही जागा ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीची असल्याचा दावा करीत हे कार्यालय आरक्षित जागेवर थाटल्याचा आरोप झाल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
ज्ञानेश्वर सोसायटीच्या जमिनीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागाने मंजुरी दिल्याप्रमाणे ही जागा दवाखाना व बालवाडी यासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याकडे तक्रारदार विश्वनाथ पटवर्धन यांनी लक्ष वेधले आहे. या आरक्षित जागेवर ई प्रभाग कार्यालय थाटणे म्हणजे एकप्रकारे महापालिकेचे अतिक्रमण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून दोषींवर एमआरटीपीअंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी पटवर्धन यांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाकडे केली आहे.
आम्ही कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केलेले नाही. संबंधित जागा ही अ‍ॅमेनिटी स्पेस म्हणून असून विकासकाकडून ती महापालिकेला हस्तांतरित झाल्याचे केडीएमसीचे म्हणणे आहे. दरम्यान, रविवारचा उद्घाटनाचा कार्यक्रम चांगलाच वादग्रस्त ठरला. हरकतीनंतरही उद्घाटनाचा घाट घालण्यात आल्याने पटवर्धन यांच्यासह ज्ञानेश्वर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळीच कार्यालयाच्या ठिकाणी जमा होऊन उद्घाटनाला तीव्र विरोध केला. यावेळी त्यांनी महापालिकेच्या कारभाराचा निषेध करत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.
हा विरोध होत असतानाच सर्वपक्षीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीदेखील घटनास्थळी दाखल होत आम्हाला महापालिका नको,तर २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. गावे वगळण्याचा निर्णय झाला असताना महापालिकेचे प्रभाग कार्यालय हवेच कशाला, असा सवाल त्यांनी केला. ‘मुक्त करा, मुक्त करा, २७ गावे मुक्त करा’, ‘नको नको भ्रष्टाचारी महापालिका नको नको’ अशा प्रकारचे निषेधाचे फलकही त्यांच्याकडून दाखवण्यात आले. आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी मागवण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत विरोध करणाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. महापौर देवळेकर उद्घाटनासाठी आले असता ज्ञानेश्वर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनादेखील घेराव घालत जाब विचारला. त्यांच्याकडून निषेधाच्या घोषणा दिल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले. यात स्थानिक आणि शिवसैनिक यांच्यात जुंपल्याचे दिसून आले. पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करीत वातावरण शांत केले. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही.
रिजन्सी ग्रुप यांनी अ‍ॅमेनिटी स्पेस व त्यावरील बांधकामांसह महापालिकेला संबंधित जागा हस्तांतरित केली आहे. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमण केले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. या जागेवरील काही भागामध्ये ई प्रभाग कार्यालय उभारण्यात आले आहे. उर्वरित जागेत आरक्षणाप्रमाणे सुविधा पुरवल्या जाणार आहेत. प्रभाग कार्यालयदेखील नागरिकांच्या सोयीसाठीच आहे, असे महापौर देवळेकरांनी लोकमतला सांगितले. त्यामुळे जो वाद घातला जातोय, ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले. तर, आता महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा देणार असल्याची माहिती तक्रारदार पटवर्धन यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The inauguration of the disputed office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.