जादा परतावा देण्याच्या अमिषाने महिलेने घातला चार लाखांचा गंडा
By जितेंद्र कालेकर | Updated: April 5, 2023 15:28 IST2023-04-05T15:28:06+5:302023-04-05T15:28:23+5:30
वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: कंपनीची व्यवस्थापक असल्याची केली बतावणी

जादा परतावा देण्याच्या अमिषाने महिलेने घातला चार लाखांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: व्हर्स ग्लोबल डिजिटल कंपनीची व्यवस्थापक असल्याची बतावणी करुन काही वस्तू विकत घेतल्यास त्यावर जादा परतावा देण्याचे अमिष दाखवून एका अनोळखी महिलेने ठाण्यातील विनित शिंदे (४३, रा. वर्तकनगर, ठाणे) यांना तीन लाख ९५ हजारांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी दिली.
वर्तकनगर येथील रहिवाशी शिंदे यांना १ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३.२० ते २ एप्रिल रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या दरम्यान एका अनोळखी महिलेने आधी व्हर्स ग्लोबलची व्यवस्थापक असल्याचे सांगितले. नंतर नोकरी हवी आहे का? अशी व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवून विचारणा केली. त्यानंतर लिंक पाठवून अभिप्राय देण्यासाठी गळ घातली. त्याचवेळी कंपनीचे प्रोडक्ट विकत घेण्यास सांगून त्यावर अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. नंतर त्यांच्या बँक खात्यातून तीन लाख ९५ हजारांची रक्कम इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करुन परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत शिंदे यांनी केलेल्या दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात महिलेविरुद्ध ४ एप्रिल २०२३ रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक तिडके हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.