लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर उल्हासनगरात महायुती नेत्यांचे शक्तींप्रदर्शन
By सदानंद नाईक | Updated: January 10, 2024 19:36 IST2024-01-10T19:36:42+5:302024-01-10T19:36:56+5:30
यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पवार गटासह इतर मित्र पक्षाचे नेते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर उल्हासनगरात महायुती नेत्यांचे शक्तींप्रदर्शन
उल्हासनगर: लोकसभा निवडणुकीत एनडीएतील कोणत्याही पक्षाला उमेदवारी मिळालीतरी, त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे दाखविण्यासाठी महायुतीतील स्थानिक नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पवार गटासह इतर मित्र पक्षाचे नेते उपस्थित होते.
उल्हासनगर शहर हे उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात विभागले असून शहरातील एकून साडे चार लाख मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, पीआरपी यांच्यासह १५ मित्र पक्षांनी शहर भाजप संपर्क कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बुधवारी दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी एनडीएने कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला तिकीट दिल्यास, त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्र असणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे हे खासदार म्हणून निवडून आले असून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत महायुतीच्या नेत्याच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे.
एनडीएच्या मित्र पक्षाच्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार कुमार आयलानी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखिजा, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख रमेश चव्हाण, राजेंद्र सिंग भुल्लर, अरुण अशान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भारत गंगोत्री, पीआरपीचे प्रमोद टाले यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महायुतीच्या नेत्याच्या पत्रकार परिषदेवरून लोकसभेच्या बिगुल वाजल्याचे चित्र होते. निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांकडून आल्याचे जाणवत होते. एनडीएतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याला लोकसभेची उमेदवारी दिलीतरी, त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व मित्र पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्थानिक नेत्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.