Important posts given to preferred corporators | मर्जीतील नगरसेवकांनाच दिली महत्त्वाची पदे

मर्जीतील नगरसेवकांनाच दिली महत्त्वाची पदे


लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदर मनपात ठरावीक मर्जीतील नगरसेवकांना महत्त्वाची पदे दिली जात असल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. तर, माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांना महत्त्वाची पदे मिळत असल्याने त्यांचे पक्षातील वजन कायम असल्याचे मानले जात आहे.
उपमहापौरपदी मेहता समर्थक हसमुख गेहलोत यांची वर्णी लावली. गेहलोत हे भाजपचे गटनेते आहेत. शिवाय, स्थायीचे सदस्यही आहेत. भाजपमध्ये एका व्यक्तीला एक पद असे धोरण असले, तरी गेहलोत यांना मात्र एकाचवेळी दोन महत्त्वाची पदे आणि स्थायी समिती सदस्यत्व अशी खैरात पक्षाने केली आहे.
सभागृह नेतेपदी ज्येष्ठ भाजप नगरसेवक रोहिदास पाटील यांना बाजूला करून नगरसेवक प्रशांत दळवी यांची नियुक्ती केली गेली. त्यावेळी पाटील यांना पूर्वकल्पनाच देण्यात आली नाही. स्वत:च्या जागी दळवींची नियुक्ती झाल्याचे कळल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
दळवी हे शिवसेना सोडून भाजपमध्ये आले असले, तरी ते मेहता यांचे कट्टर समर्थक आहेत. अडीच वर्षांत दळवींना पाणीपुरवठा आणि मलनि:सारण समितीचे सभापतीपद दिले. स्थायीचे सदस्यही त्यांना केले. आता सभागृह नेतेपदी त्यांची वर्णी लावून मेहतांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिलेला धक्का मानला जातो.
जिल्हाध्यक्ष म्हणतात यावर नंतर बोलू...
भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. सुरेश येवले म्हणाले की, शहरात भाजपला नेहमीच स्वत:च्या मर्जीतल्या कंपनीप्रमाणे काहींनी राबवले आहे. त्यामुळे पक्षापेक्षा त्यांच्या मर्जीतील लोकांना महत्त्वाची पदे दिली जात आहेत. गेहलोत यांना उपमहापौर, गटनेते आणि स्थायी समिती सदस्य, अशी तीन पदे दिली आहेत. तर, दळवींना दुसऱ्या प्रभागातून तिकीट दिले. पाणीपुरवठा समिती सभापती केले. अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा मेहतांनी पळून जाण्यास दळवी यांचीच गाडी वापरली होती. पोलिसांनी नंतर ती जप्त केली. सभागृह नेतेपद त्याची बक्षिसी आहे का, असा सवाल येवले यांनी केला आहे. याप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी या विषयावर आपण नंतर बोलू असे सांगितले.

Web Title: Important posts given to preferred corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.