कोंडीच्या अहवालाची अंमलबजावणी करा

By Admin | Updated: April 22, 2017 02:24 IST2017-04-22T02:24:54+5:302017-04-22T02:24:54+5:30

शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने तयार केलेल्या अहवालाची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची केडीएमसी, रिक्षाचालक व युनियनचे

Implement the report of the dilemma | कोंडीच्या अहवालाची अंमलबजावणी करा

कोंडीच्या अहवालाची अंमलबजावणी करा

डोंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाने तयार केलेल्या अहवालाची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची केडीएमसी, रिक्षाचालक व युनियनचे पदाधिकारी आणि विविध संस्थांमध्ये चर्चा झाली. या अहवालाबाबत वाहतूक विभागाने आॅनलाइनद्वारे हरकती-सूचना मागवल्या आहेत. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांनी या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
शहरातील रिक्षा, गल्लीबोळात असलेले रिक्षा स्टॅण्ड, बेशिस्त चालक, बेकायदा फेरीवाले, पार्किंग व्यवस्थेचा अभाव यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीत भर पडत असल्याचे वाहतूक विभागाने आपल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालाबाबत नागरिकांनी www.thanepolice.org या वेबसाइटवर, cp.thane.dcptraffic@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर तसेच ठाणे वाहतूक पोलीस शाखा, तीनहातनाका, ठाणे (प.) येथे लेखी स्वरूपात हरकती-सूचना मांडाव्यात, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. शहरातील रिक्षा, रिक्षा स्टॅण्ड यावर या अहवालात वाहतूक विभागाने ठपका ठेवल्याने रिक्षा युनियन आणि नगरसेवक मंदार हळबे यांनी या अहवालात त्रुटी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यात सुधारणा आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी केली. या अहवालाचे कागदी घोडे नाचवणार का, अहवाल केडीएमसी आयुक्तांना सादर केला का, असे प्रश्न नागरिकांनी केले आहेत.
शहरात किती रिक्षा स्टॅण्ड वैध आहेत, याची माहिती समितीला आहे का? ती त्यांनी आधी घ्यावी. वास्तव समोर आल्यावर जे निरीक्षण केले, ते दालनात बसून केले की, प्रत्यक्ष फिल्डवर केले, हे स्पष्ट होईल, असे भाजपाप्रणीत रिक्षा युनियनचे अध्यक्ष दत्ता माळेकर म्हणाले. (प्रतिनिधी)

वाहतूककोंडीप्रश्नी समितीने नोंदवलेले निरीक्षण योग्य असले, तरी स्थानक परिसरातील कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झालेले दिसत नाहीत. अनेक रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जातात, त्याचेकाय? रिक्षा स्टॅण्डबद्दल तर बोलायची सोय नाही.
- विवेक पंडित,

संस्थापक, विद्यानिकेतन
समितीच्या अहवालावर डोंबिवलीत जनतादरबार भरवावा. त्यात उघडपणे मत घेऊन अंमलबजावणीबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
- कुशल जोशी

पारदर्शक कारभारामुळेच हात दाखवा, रिक्षा थांबवा, अशी बकाल अवस्था आणि जागा तिथे रिक्षा स्टॅण्ड उभे केले जातात. त्या विषयावर काय बोलावे. - योगेश दामले

‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे अहवाल तर तयार झाला. नागरिकांनी या अहवालावर आपल्या सूचना नोंदवाव्यात. त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.
- सागर घोणे,

श्रीखंडेवाडी रहिवासी मित्र मंडळ
वाहतूककोंडीचा विषय ‘लोकमत’ने योग्य पद्धतीने उचलून धरला आहे. त्यात सामाजिक संस्थांनीही सहभाग घ्यायला हवा. अहवालाच्या अंमलबजावणीसाठी स्वाक्षरी अभियान, सभा, बैठका तातडीने व्हायला हव्यात.
- प्रवीण दुधे,

उपाध्यक्ष, गणेश मंदिर संस्थान
नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ‘लोकमत’ने मांडला. वाहतूक विभागाने महापालिकेकडे अहवाल सादर करावा. आयुक्तांकडे पाठपुरावा करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एक त्रस्त नागरिक म्हणून माझीही आहे.
- रमेश म्हात्रे,
सभापती, स्थायी समिती, केडीएमसी

शिवसेना नागरिकांच्या बाजूने आहे. अहवालाच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत नागरिकांची बैठक घेणार आहोत.
- भाऊसाहेब चौधरी,
शहरप्रमुख, शिवसेना, डोंबिवली

अहवालात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासंदर्भातील माझे मत मी वाहतूक विभागाकडे मांडणार आहे. त्यानुसार, त्यात बदल आणि अंमलबजावणी न झाल्यास मी आंदोलनावर ठाम आहे.
- मंदार हळबे, नगरसेवक

एखाद्या अहवालात महापालिकेवर गंभीर ताशेरे ओढले जात असतील, तर ते योग्य नाही. महापालिकेने तातडीने अंमलबजावणी केलीच पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून मी आक्रमकपणे जाब विचारेन.
- प्रकाश भोईर,
विरोधी पक्षनेते, केडीएमसी

Web Title: Implement the report of the dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.