कारखान्यांना प्रदूषणाचा फास

By Admin | Updated: July 8, 2016 03:41 IST2016-07-08T03:41:00+5:302016-07-08T03:41:00+5:30

सांडपाण्यावर हवी तशी प्रक्रिया करण्यात अपयशी ठरल्याने डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील १५१ कारखान्यांना सांडपाणी तयार होणार नाही, असे बजावण्यात आल्याने हे कारखाने बंद करावे

The impact of pollution on the factories | कारखान्यांना प्रदूषणाचा फास

कारखान्यांना प्रदूषणाचा फास

- मुरलीधर भवार/पंकज पाटील , डोेंबिवली/अंबरनाथ

सांडपाण्यावर हवी तशी प्रक्रिया करण्यात अपयशी ठरल्याने डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील १५१ कारखान्यांना सांडपाणी तयार होणार नाही, असे बजावण्यात आल्याने हे कारखाने बंद करावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचवेळी सांडपाणी प्रक्रियेचा वाद न मिटल्याने अंबरनाथमधील १०० कारखानेही बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
डोंबिवली औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या फेजमधील कारखान्यांच्या रासायनिक सांडपाण्यावर होणाऱ्या प्रक्रियेत आॅक्सिजनचे प्रमाण कमी आढळल्याने आणि ते सुधारण्यासाठी वारंवार तंबी देऊनही उपयोग न झाल्याने सांडपाणी प्रक्रिया केंद्र ४८ तासांत बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली आहे. केंद्रच बंद होणार असल्याने सांडपाणी थेट खाडीत जाण्याचा धोका लक्षात घेऊन या कारखान्यांना सांडपाणी तयारच होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिणामी, हे कारखाने बंद करावे लागण्याचा धोका उद््भवला आहे.
त्याचवेळी अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमधील प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेला प्रकल्प योग्यप्रकारे कार्यरत नसल्याचा ठपका ठेवत प्रदूषण मंडळाने तो बंद करुन त्यात सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी या प्रकल्पात सांडपाणी सोडणाऱ्या १०० हून अधिक कारखान्यांनाही नोटीस काढत ते कारखाने बंद करण्याची कारवाईही सुरू केली आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र ७२ तासात बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. कारखान्यांनी त्यांचे रसायनमिश्रित पाणी केंद्राकडे प्रक्रियेसाठी पाठवू नये, अशी सूचनाही मंडळाने संबंधित कारखान्यांना केली आहे. हे केंद्र बंद झाल्यावर पर्यायी व्यवस्था काय केली जाणार आहे, याचे उत्तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे नसल्याचे स्पष्ट झाले.
डोंबिवली औद्योगिक परिसरात दोन्ही फेजमधील ६५० कारखान्यातून तयार होणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया करण्यासाठी दोन केंद्रे आहेत. त्यातील पहिल्या केंद्रातील काम निकषानुसार सुरू आहे. गेली तीन वर्षे सांडपाण्याचा वाद सुरू आहे. त्याकडे कोणीच लक्ष न दिल्याने तो आता हरीत लवादाकडे पोचला आहे. लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला धारेवर धरल्याने मंडळ कामाला लागले. दुसऱ्या फेजमधील दीड दशलक्ष क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया करुन सोडल्या जाणाऱ्या पाण्यात आॅक्सिजनचे प्रमाण वाढलेले नाही. त्यात सुधारणा होत नसल्याने हे केंद्र बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली आहे. ती बजावल्यापासाून ७२ तासात केंद्रातील प्रक्रिया बंद करणे बंधनकारक असल्याचे मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांनी सांगितले. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सुधारणा कशाप्रकारे होतील व किती काळात केल्या जातील, याचा प्रस्ताव मंडळाला सादर करावा लागेल. मंडळाला तो पटला तरच सांडपाणी प्रक्रिया केंद्र पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. अन्यथा हे केंद्र कायमस्वरुपी बंद ठेवावे लागणार आहे. तोवर कारखान्यांना सांडपाणी तयार होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. तसेच सांडपाणी सोडताही येणार नाही.

अंबरनाथ एमआयडीसीतील कारखान्यांवर गंडांतर
आनंदनगर औद्योगिक वसाहतीत सर्वाधिक ८५० कारखाने आहेत. सोबतच वडवली एमआयडीसी, चिखलोली एमआयडीसी आणि मोरिवली एमआयडीसीत १५० कारखाने आहेत. अंबरनाथ शहरातील हजार कारखान्यांपैकी १५० कारखाने हे रासायनिक प्रक्रिया करणारे आहेत. त्यातून बाहेर पडणाऱ्या रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सात दशलक्ष लीटर क्षमेतेचा सीईटीपी प्रकल्प सुरु आहे. तो चालविण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली होती.
पण ठेकेदाराने तेथे काम न करता त्या प्रकल्पाच्या नावावर बँकेतून कर्ज उचलण्याचे काम केले. योग्य काम केले जात नसल्याने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी त्याचे काम बंद करण्याचे आदेश दिले आणि हे काम ‘आमा’ या कारखानदारांच्या संघटनेला दिले. कारखानदारांची संघटना हे काम जबाबदारीने करेल, अशी अपेक्षा होती. संघटनेतर्फे कामही सुरु होते. मात्र मूळ ठेकेदार या कामातून दूर होत नसल्याने हा प्रकल्प संघटना आणि ठेकेदार या दोघांच्याही ताब्यात राहिला.
संघटनेतर्फे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होते. मात्र त्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. या केंद्रातील गाळ कित्येक वर्ष काढला न गेल्याने तो पूर्ण क्षमतेने चालविणे अवघड जात होते. एमआयडीसीच्या हलगर्जीचा फटका कारखानदारांना बसला. सीईटीपी पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचा ठपका ठेवत प्रदूषण मंडळाने प्रकल्प बंद करुन पूर्ण क्षमतेने चालविण्याचे आदेश दिले आहे. हा प्रकल्प बंद झाल्याने कारखान्यातुन बाहेर पडणाऱ्या रासायनिक पाण्यावर कोणतीही प्रक्रिया होणार नाही. सोबत या सीईटीपीत जे कारखानदार पाणी सोडतात त्यांनाही प्रकल्प बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. त्यासाठी १०० हून अधिक कारखान्यांना नोटीस बजावत ते कारखाने बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. सीईटीपीसोबत कारखाने बंद करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्याने कारखानदार चिंतेत आहेत.

‘बायोमास’ पाण्यात?
दुसऱ्या फेजमधील सांडपाणी प्रक्रियेत प्रदूषणाची मात्रा कमी करण्यासाठी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये बायोमास टॉवर उभा केला होता. तो इटलीच्या तंत्रज्ञानावर आधारित होता. अनुदानाची वाट न पाहता कारखानदारांनी एक कोटी ७५ लाखांचा खर्च करुन तो उभारला होता. बॅक्टेरिया सांडपाण्यातील रासायनिक संयुगे खातात. त्यामुळे प्रदूषण कमी होते. त्या तंत्राचा वापर करण्यात आला होता.

लवादाकडे आज सुनावणी
राष्ट्रीय हरीत लवादाकडे शुक्रवारी, ८ जुलैला होणाऱ्या सुनावणीत केंद्रीय वन व पर्यावरण खाते प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. त्यातील स्पष्टीकरणावरच पुढील कारवाई अवलंबून आहे.
‘वनशक्ती’चे याचिकाकर्ते अश्वीन अघोर यांनी सांगितले, पहिल्या फेजमधील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यातही आॅक्सिजनचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे मंडळाच्या अधिकाऱ्यांचा आॅनलाईन रिपोर्टचा दावा खोटा, दिशाभूल करणारा आहे.

Web Title: The impact of pollution on the factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.