उंच मूर्तींसाठी विसर्जन घाट
By Admin | Updated: September 7, 2016 02:38 IST2016-09-07T02:38:08+5:302016-09-07T02:38:08+5:30
गणेशोत्सवात पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी उल्हासनगर महापालिका दक्ष आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने हिराघाट येथील बोट क्लब व उल्हासनगर

उंच मूर्तींसाठी विसर्जन घाट
उल्हासनगर : गणेशोत्सवात पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी उल्हासनगर महापालिका दक्ष आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने हिराघाट येथील बोट क्लब व उल्हासनगर रेल्वेस्थानकाजवळ कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. तर सेंच्युरी रेयॉन कंपनी व आयडीआय कंपनीजवळ उल्हास नदी किनारी विसर्जन घाट बनवला आहे. आयुक्त मनोहर हिरे, शहर अभियंता राम जैस्वाल, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी, एकनाथ गायकवाड यांनी त्याची पाहणी केली.
उल्हासनगरातील बहुंताश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे उंच मूर्तींची स्थापना करतात. मात्र, उंच मूर्तींच्या विर्जसनाची सोय शहरात नसल्याने गणेश मंडळांना कल्याण खाडी, पाचवा मैल अथवा मुंबई येथे जावे लागत होते. कल्याण-डोंबिवली महापालिका व राजकीय पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी उल्हासनगरातील उंच मूर्तींच्या विसर्जनाला केडीएमसी हद्दीत विरोध केला. त्यामुळे उंच मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला. शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी मागील वर्षी राजकीय तोडगा काढल्याने उंच मूर्तींचे विसर्जन कल्याण खाडीत झाले होते. मात्र पुन्हा विरोध वाढल्याने उंच मूर्तींच्या गणेश मंडळासमोर विसर्जनाचे संकट उभे ठाकले होते. त्यामुळे केणी व एकनाथ पवार यांनी मोठ्या मूर्तींसाठी नवीन विसर्जन घाट उभा करण्याची संकल्पना हिरे यांच्या पुढे मांडली. हिरे यांची संमती मिळताच आयडीआय कंपनीजवळ उल्हास नदी किनारी मोठ्या मूर्तींसाठी विसर्जन घाट विकसित केला. तसेच हिराघाट बोटक्लब येथे लहान व मोठ्या मूर्तींसाठी दोन कृत्रिम तलाव उभारले आहेत. उल्हासनगर रेल्वेस्थानकाजवळ नगरसेवक सुरेश जाधव, माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांनी १० वर्षांपूर्वी कृत्रिम तलावाची निर्मिती केली. तसेच कांबा गावाजवळ शहरातील गणपर्ती विजर्सन घाट बनवून उल्हास नदी किनारी रस्ता बनवला आहे. (प्रतिनिधी)