ठाणे : आपल्याकडे रोज खून, बलात्कार, भ्रष्टाचार, शोषण, लूट, दुसऱ्याला फसवणे सुरू आहे. या गोष्टी अन्य कोणत्या राष्ट्रात नाहीत. आदिवासी भागाला गरजेपुरतेही पाणी मिळत नाही आणि शहरी भागातील ७० टक्के पाणी वापरतात... असली साक्षरता काय कामाची, असा सवाल करीत आपला देश अशा साक्षरतेने बुडत चालला आहे, त्यामुळे निरक्षरतेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे, असे उपरोधिक विधान ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी बुधवारी केले. 'ग्रंथाली'तर्फे वाचन दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे सभागृहात नेमाडे यांचे चित्र चित्रकार विजयराज बोधनकर यांनी कॅनव्हासवर चितारले.
निरक्षरता पसरली तर काय होईल?
यावेळी त्यांच्या भावमुद्रा बोधनकर यांना टिपता याव्या यासाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी नेमाडे यांना बोलते केले.
नेमाडे यांच्या निरक्षरतेबाबतच्या विधानाचा संदर्भ पकडून केतकर म्हणाले की, पुन्हा निरक्षरता पसरली तर काय होईल? त्यावर नेमाडे म्हणाले की, जर-तरची भाषासुद्धा साक्षरतेचेच लक्षण आहे.
जगभरात ज्या लोकांनी महान साहित्याची निर्मिती केली. ते कुठे साक्षर होते? बहिणाबाई यांचे इतके मोठे उदाहरण आहे.
कविता लिहिण्यासाठी अडाणी व्हावे लागते
तब्बल ३० वर्षांनंतर 'सट्टक' नावाचा कविता संग्रह नेमाडे यांनी लिहिला. त्याबाबत नेमाडे म्हणाले की, कविता हा वाङ्ग्य प्रकार मला स्वतःला आवडतो. कविता लिहिण्यासाठी मला वेळ मिळाला नाही. कविता लिहिण्यासाठी अडाणी व्हावे लागते. ते 'अडाणी' नव्हेत बरे का, असे नेमाडे म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
हिंदू हा शब्द इंग्रजांनी आणला
जात हा फॅक्टर याआधी फारसा नव्हता. इंग्रजांनी त्याला खतपाणी घातले. हिंदू हा शब्द इंग्रजांनी आणला. सिंधू नदीच्या अलीकडे राहणारे लोक म्हणजे भारतीय. मात्र 'स'चा उच्चार 'ह' केला जात असल्याने उच्चार 'हिंदू' झाला.
त्याचबरोबर दुष्ट आणि स्वार्थी लोकांनी त्यांच्या स्वार्थोंकरिता राष्ट्र निर्माण केली. ३०० वर्षांत या देशात एकही मोठा माणूस जन्माला आला नाही, अशी टिप्पणी नेमाडे यांनी केली.