मुंब्य्रात बेकायदेशीर लसीकरण; निरंजन डावखरेंची चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:45 IST2021-08-17T04:45:32+5:302021-08-17T04:45:32+5:30
ठाणे : मुंब्रा येथे बेकायदेशीरपणे लसीकरण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे महापालिकेच्याच आरोग्य विभागाने उघडकीस आणला आहे. याची गंभीर ...

मुंब्य्रात बेकायदेशीर लसीकरण; निरंजन डावखरेंची चौकशीची मागणी
ठाणे : मुंब्रा येथे बेकायदेशीरपणे लसीकरण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे महापालिकेच्याच आरोग्य विभागाने उघडकीस आणला आहे. याची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.
मुंब्रा येथे बेकायदेशीरपणे काही नागरिकांचे लसीकरण केले जात होते. महापालिकेच्या कोविड केअर केंद्रातून लसी घेतल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याचसंदर्भात काही दक्ष नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी छापा टाकून लसीकरण केंद्र बंद केले. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. या प्रकाराने महापालिकेच्या लसीकरणाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाल्याची टीका आमदार डावखरे यांनी केली आहे.
केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी मोफत दिलेल्या लसींवर काही व्यक्ती डल्ला मारत आहेत. महापालिकेचा लससाठा खासगी व्यक्तींपर्यंत कसा पोहोचला? एकीकडे सामान्य नागरिकांना लस उपलब्ध होत नाही. मात्र, महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळेच मर्जीतील व्यक्तींनाच लस दिली जात आहे, याकडेही डावखरे यांनी लक्ष वेधले आहे.