‘गोविंदवाडी बायपास’चा बेकायदा वापर

By Admin | Updated: March 30, 2017 05:38 IST2017-03-30T05:38:16+5:302017-03-30T05:38:16+5:30

गोविंदवाडी बायपास रस्त्याचे दुर्गाडी पुलाच्या दिशेला काम बाकी आहे. तरीही

Illegal use of 'Govindwadi Bypass' | ‘गोविंदवाडी बायपास’चा बेकायदा वापर

‘गोविंदवाडी बायपास’चा बेकायदा वापर

कल्याण : गोविंदवाडी बायपास रस्त्याचे दुर्गाडी पुलाच्या दिशेला काम बाकी आहे. तरीही, वाहनचालकांनी या रस्त्याचा वापर सुरू केला आहे. विनापरवाना वाहतुकीसाठी पुलाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलिसांकडे केली होती. मात्र, त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या पुलावर होणाऱ्या अपघातांना पोलीसच जबाबदार आहेत, अशी बाब महामंडळाच्या पत्रव्यवहारावरून उघड झाली आहे.
इयत्ता अकरावीत शिकणारा बिलाल चौधरी (रा. गोविंदवाडी परिसर) हा १५ मार्चला दुचाकीवरून जात असताना त्याला एका ट्रकने धडक दिली. त्यात त्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम एमएमआरडीएने केले आहे. २०११ मध्ये हा रस्ता तयार करण्यास घेतला होता. त्यावर, १५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या रस्त्याच्या विरोधात दोन तबेलाधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम अपूर्ण राहिले होते. रस्त्याच्या बदल्यात तबेलाधारकांना पर्यायी जागा देण्याचे महापालिकेने कबूल केले. मात्र, ही जागा दिलेली नाही. त्यामुळे या रस्त्याचा पेच अद्याप कायम आहे. रस्त्याचे एका बाजूचे काम पूर्ण होण्याआधीच वाहनचालकांनी त्याचा वापर सुरू केला. तसेच शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागण्यापूर्वी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून लवकरच दुसरी बाजू सुरू केली जाईल, असे स्पष्ट केले होते.
दुर्गाडीच्या दिशेला पुलाचे थोडेफार रस्त्याचे काम शिल्लक असताना वाहनचालकांनी रस्त्याचा वापर सुरू केला आहे. मात्र, रस्त्याचा हा बेकायदा वापर होत असल्याची बाब रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय भोंडे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिसांच्या निदर्शनास आणली होती. त्यासाठी त्यांनी ११ जानेवारीला एक पत्रही पोलिसांना दिले आहे. काम अपूर्ण असलेल्या रस्त्याच्या बाजूने कल्याण-डोंबिवली महापालिकेचा घनकचरा वाहून नेणाऱ्या जय मल्हार कंपनीचा ट्रक व जेसीबी जातो. अपूर्ण रस्त्याचा विनापरवानगी वापर करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी महामंडळाने पोलिसांकडे केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. सामाजिक कार्यकर्त्या अजमत आरा यांनी सांगितले की, गोविंदवाडी पुलाचे काम मंजूर विकास आराखड्यानुसार झालेले नाही. रस्त्यासाठी महापालिकेने अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. त्याचवेळी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने तीन सदस्य समिती नेमली होती. न्यायालयाने दिलेल्या नकाशानुसार रस्त्याचे काम झालेले नाही. मंजूर नकाशानुसार रस्त्याचे काम होत नसल्याचे तत्कालीन आयुक्त, नगररचनाकार, तहसीलदार, भूमी अभिलेख यांनी मान्य केले आहे. तसा पत्रव्यवहारही आरा यांच्याकडे आहे. नागरिकांची महापालिकेने दिशाभूल केली आहे. तशी तक्रारही आरा यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिली होती. पोलसांनी हा विषय दिवाणी असल्याने न्यायालयात जाण्याचा सल्ला आरा यांना दिला होता. त्यांच्या मते मंजूर नकाशाप्रमाणे हा रस्ता व्हावा. त्यामुळे हा रस्ता चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे. लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे हा रस्ता तयार केला जात असल्याचे माहितीच्या अधिकारात महामंडळाने आरा यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. हे अतिरिक्त काम असल्याने ते एमएमआरडीएच्या निधीतून केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

रस्त्याचे वळण ठरतेय अपघातास कारणीभूत

‘उमंग’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार शेख यांनी सांगितले की, रस्त्याला रेलिंग असावे. रस्त्याचे वळण अपघातास कारणीभूत ठरते. पत्रीपुलाच्या दिशेला नाल्याचे काम महामंडळाऐवजी महापालिकेने केले आहे.त्यामुळे तेथील सोसायटीमधील नागरिकांचा रस्ता बंद झाला आहे. तेथील नाला अरुंद आहे. अपूर्ण रस्त्याचा विनापरवानगी वापर करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी महामंडळाने पोलिसांकडे केली आहे.

Web Title: Illegal use of 'Govindwadi Bypass'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.