भार्इंदर पालिका उद्यानात बेकायदा चित्रीकरण
By Admin | Updated: September 1, 2016 02:54 IST2016-09-01T02:54:09+5:302016-09-01T02:54:09+5:30
मीरा-भार्इंदर पालिकेच्या पश्चिमेकडील राव तलाव उद्यानात एका हिंदी मालिकेचे मंगळवारी बेकायदा चित्रीकरण सुरु असल्याचे उघड झाले.

भार्इंदर पालिका उद्यानात बेकायदा चित्रीकरण
भाईंदर : मीरा-भार्इंदर पालिकेच्या पश्चिमेकडील राव तलाव उद्यानात एका हिंदी मालिकेचे मंगळवारी बेकायदा चित्रीकरण सुरु असल्याचे उघड झाले. चित्रीकरणाबरोबरच मेजवानीचा बेतही तंबू ठोकून आखला होता. त्याचे कोणतेही शुल्क पालिकेने वसूल केले नाहीच. या उलट उद्यानाबाहेरील इमारतींजवळही होत असलेल्या चित्रीकरणाच्या करवसुलीवर पाणी सोडल्याचे निदर्शास आले आहे. प्रभाग अधिकारी वासुदेव शिरवळकर यांनी मात्र या चित्रीकरणासाठी १५ हजार कर भरल्याचा दावा केला आहे. परंतु, भरण्यात आलेला कर कोणत्या ठिकाणाच्या वापरासाठी आहे, हे मात्र ते स्पष्ट करु शकले नाहीत.
महासभेत मराठी आणि हिंदी मालिकांच्या चित्रीकरणासाठी अनुक्रमे ५ व १५ हजार कर वसूल करण्याच्या ठरावाला मान्यता देण्यात आली. त्यात स्टुडिओेत होणाऱ्या चित्रीकरणाला बगल दिली असून रस्त्यांसह अन्य ठिकाणी होणाऱ्या चित्रीकरणाला कराच्या जाळ्यात आणले आहे. त्याचे अधिकार प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु, अनेकदा चित्रीकरणाचा कर वसूलच केला जात नाही. यात पालिकेचे नुकसान होऊनही एकाही लोकप्रतिनिधीने त्यावर आक्षेप घेतलेला नाही. काही दिग्दर्शकांकडून कराचा भरणा केला जात असला तरी काहीजण मनोज नावाच्या मध्यस्थामार्फत अधिकाऱ्यांना चिरीमिरी देत चित्रीकरण कोणत्याही अडचणीविना पार पाडतात.
असाच प्रकार भार्इंदर पश्चिमेकडील कोळीवाड्यातील रावतलाव उद्यानात घडला. या उद्यानाजवळ काही खाजगी इमारतींमध्ये चित्रीकरण होत होते. त्याचे सर्व साहित्य उद्यानात ठेवले होते. चित्रीकरणासह त्याचे साहित्य ठेवण्यासाठी ते मंगळवारी उशीरापर्यंत खुले ठेवले होते. त्यातच या उद्यानाच्या मारुती मंदिराबाजूकडील भागात मेजवानीसाठी तंबू ठोकले होते.